जमावबंदीचे नियम धाब्यावर बसवून पुणे येथे अंनिसचे आंदोलन आणि मोर्चा !

‘विवेकाचा आवाज’ अशा घोषणा देणार्‍यांकडून अविवेकी कृत्य !

भारत तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर उभा असतांना अशा प्रकारे आंदोलन करण्याची अनुमती कशी काय देण्यात आली ? अनुमती देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी, तसेच कोरोना नियमांचा भंग करणारे अंनिसचे कार्यकर्ते यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. – संपादक 

पुणे, २० ऑगस्ट (वार्ता.) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर शासकीय नियमांना डावलून आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाच्या वेळी अनेक आंदोलकांनी मुखपट्टी (मास्क) व्यवस्थित घातले नव्हते, तर काहींनी मुखपट्टी काढून मोठमोठ्याने घोषणा दिल्या. या वेळी सामाजिक अंतरही पाळण्यात आले नाही. शहरात जमावबंदी असतांना अशा प्रकारे आंदोलन कसे काय घेण्यात आले ? असा प्रश्न सामाजिक माध्यमांतून विचारला जात आहे. ‘राज्यात, तसेच शहरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता असतांना अशा प्रकारे आंदोलन घेऊन तिसर्‍या लाटेला अप्रत्यक्षपणे खतपाणी घातल्याचे कार्य या आंदोलनातून झाले आहे. ‘विवेकाचा आवाज’ ही घोषणा देत शहरातील नागरिकांच्या आरोग्याला हानी होईल, असे ‘अविवेकी’ कृत्य अंनिसकडून करण्यात आल्या’चे संतप्त नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

 

आंदोलनाला अनुमती न देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून प्रशासनाला निवेदन !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या काही दिवस आधी येथील हिंदुत्वनिष्ठ, तसेच समाजसेवी संघटना यांच्याकडून ‘शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता अंनिसच्या आंदोलनाला अनुमती देण्यात येऊ नये’, अशा आशयाचे निवेदनही देण्यात आले होते. या निवेदनाला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही.

पुणे पोलीस प्रशासन, महापौर, तसेच जिल्हाधिकारी यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंच, गार्गी सेवा फाऊंडेशन, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.