गोव्यात २४ घंट्यांत ३ मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.) – कळंगुट पोलिसांना १९ ऑगस्ट या दिवशी कांदोळी समुद्रकिनार्‍याच्या ‘पार्किंग’च्या जागेत ३० ते ३५ वर्षांच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या दोन्ही हातांवर जखमा होत्या, तसेच गळ्याच्या भोवती चिकटपट्टी लावण्यात आली  होती. त्याचप्रमाणे शिवोली येथे २ विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २ पैकी एका प्रकरणात एका भाड्याच्या खोलीत २९ वर्षांच्या एका महिलेचा मृतदेह दोरीला टांगलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो. शवचिकित्सेनंतर पोलीस अन्वेषणाची दिशा निश्चित करणार आहेत. दुसर्‍या प्रकरणात ओशेल, शिवोली येथे एका भाड्याच्या खोलीत रशियाच्या ३५ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. तिच्या महिला सहकार्‍याने पोलिसांना सांगितले की, आदल्या रात्री ती मुलगी आणि आपण स्वतः मद्यप्राशन करून झोपलो होतो. दुसर्‍या दिवशी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी शवचिकित्सेनंतर पोलीस अन्वेषणाची दिशा निश्चित करणार आहेत. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांविषयीची माहिती रशियाच्या वकिलातीला दिली आहे.