सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचे श्रेष्ठत्व !
२२ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘संस्कृतदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘संस्कृतभाषा ही देवांची भाषा; म्हणून तिला ‘सुरवाणी’, ‘गीर्वाणवाणी’ असे म्हणतात. ही सर्व भाषांमध्ये प्रमुख, म्हणजेच ‘सर्व भाषांची जननी’ असून ती जगातील अतिप्राचीन भाषा म्हणून गौरवली जाते. संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून तिची ओळख करून देणारे श्रौत आणि स्मार्त वाङ्मय याच भाषेने विभूषित केले आहे. सर्व ग्रंथ आणि १८ पुराणे याच भाषेने चिरंजीव केली आहेत. रामायण आणि महाभारत ही महान ग्रंथरत्ने संस्कृत भाषेत विराजमान असल्याने भारतीय एकात्म संस्कृतीची रूजवण घातली गेली.
अशा भाषेला पंडित (?) नेहरू यांनी ‘मृतभाषा’ म्हटले !
सुभाषिते : संस्कृतचा अमूल्य ठेवा !
संस्कृत भाषा ही अतिशय मधुर असून तिच्यातील सुभाषितामुळे ती अधिकच भारदस्त झाली आहे. सुभाषिते हा संस्कृत भाषेचा अमूल्य ठेवा आहे. सज्जनप्रशंसा, दुर्जननिंदा, गुरुस्तुती, चारित्र्य आणि विद्यासंपादन यांचे महत्त्व, पुत्राचे कर्तव्य, सत्य-असत्य, विद्वान-मूर्ख अशा अनेक विषयांवर सुभाषिते असतात. ती पाठांतरास सुलभ असून विद्यार्थ्यांच्या आयुष्यभराची शिदोरी आहे. सुभाषिते त्रिकालाबाधित सत्य पटवून देणारी आहेत.
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ।।
अर्थ : क्षणाक्षणाने विद्या आणि कणकणाने धन मिळवावे. जर क्षण वाया घालवला, तर विद्या कशी मिळेल ? जर कण वाया घालवला, तर धन कसे मिळेल ?
सम्पत्सु महतां चित्तं भवत्युत्पलकोमलम् ।
आपत्सु च महाशैलं शिलासङ्घातकर्कशम् ।।
– नीतीशतक, श्लोक ५६
अर्थ : महान व्यक्तींचे मन (स्वभाव) संपत्काळात कमलपुष्पाप्रमाणे कोमल असते आणि आपत्काळात विशाल पर्वताच्या शिळांप्रमाणे कठोर बनते.
शीलं शौर्यमनालस्यं पाण्डित्यं मित्रसङ्ग्रहः ।
अचोरहरणीयानि पञ्चैतान्यक्षयो निधिः ।।
अर्थ : चारित्र्य, पराक्रम, कष्टाळूपणा, विद्वत्ता आणि जोडलेले (चांगले) मित्र या ५ गोष्टी म्हणजे चोरता न येणारा अन् र्हास न पावणारा खजिना (ठेवा) आहे.
वाणीशुद्धीसह चांगले संस्कार करणारी संस्कृत भाषा !
संस्कृत ही एकच अशी भाषा आहे की, जिची अक्षरे आणि नादातून शक्तीशाली मंत्र निर्माण होऊ शकतात. मंत्रोच्चारातून ज्या नादातून सभोवतालचा परिसर संरक्षित, पवित्र आणि मंगलमय होतो. संस्कृत भाषेत काव्यमय नाद, स्वरमेळ, तालबद्धता ही अंगभूत आहे. या भाषेत वाणी शुद्ध, स्पष्ट करण्याची किमया आहे; म्हणूनच बालपणी मुलांनी संस्कृत स्तोत्रे पाठ केली, म्हटली, तर त्यांची वाणी आणि उच्चारण शुद्ध अन् स्पष्ट होते. वाणीला वळण चांगले लागते आणि स्तोत्र पठणामुळे मन एकाग्र होते. मुलांवर संस्कार चांगले होतात. ‘सत्यमेव जयति ।’ म्हणजे ‘नेहमी सत्याचाच विजय होतो’, ‘योगक्षेमं वहाम्यहम्।’ म्हणजे ‘मी चरितार्थ चालवतो.’, ‘अहर्निशं सेवामहे’ म्हणजे ‘आम्ही रात्रंदिवस सेवारत आहोत’, ‘शं नो वरुणः।’ म्हणजे ‘जलदेवता वरुण आमचे कल्याण करो’ इत्यादी ब्रीदवाक्ये अनेक संस्थांमध्ये पहावयास मिळतात.
सुरचित आणि सर्वार्थाने परिपूर्ण अशी संस्कृत भाषा !
संस्कृत भाषा एकात्मतेची गंगोत्री म्हणून तिचे अध्ययन, अध्यापन अखंडपणे चालू राहिलेच पाहिजे. ज्योतिष, गणित, आयुर्वेद, अर्थशास्त्र, संगीत इत्यादींचे मूलग्रही ज्ञान यातच मिळते. भारतातील कित्येक भाषाभगिनींना याच अमरवाणीने समृद्धी आणली आहे; म्हणून ही अनेक भाषांची उपकर्ती आहे. बहुसंख्य भारतीय भाषा संस्कृृतोद्भव असल्याने या भाषेचे साहाय्य सतत घ्यावे लागते. भारतीय धर्मशास्त्र याच भाषेत विराजमान असल्याने धार्मिक विधींत याचा उपयोग होतो. प्र्राचीन भारताचा इतिहास या भाषेशी निगडित आहे. भारतीय घटनेत १४ भाषांत संस्कृत भाषेचा अंतर्भाव केला असून या राष्ट्रभाषांच्या विकासासाठी तिचा आश्रय घ्यावा लागतो. ही भाषा सुरचित आणि सर्वार्थाने परिपूर्ण आहे. एकाच अर्थाचे अनेक शब्द हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. संस्कृत भाषेचे नियम इतके अचूक आहेत की, अद्ययावत संगणकात विशेष करून अतिशय संक्षिप्त रूपात, थोडक्यात अमर्याद ज्ञान देण्यासाठी सूत्र रूपाने संक्षिप्त रूपात जपून ठेवणे शक्य आहे; म्हणून संगणकासाठी संस्कृत ही अतिशय उपयुक्त भाषा आहे.’
– मीरा दाते (साभार : ‘धर्मभास्कर’, मार्च २०१५)