श्रावण मासातील (२२.८.२०२१ ते २८.८.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
साप्ताहिक शास्त्रार्थ
‘९.८.२०२१ या दिवसापासून श्रावण मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, श्रावण मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
आपल्या धर्मग्रंथांत वर्षाऋतूमधील श्रावण मासात प्रतिदिन विविध धार्मिक व्रते सांगितली आहेत. श्रावण मासात प्रत्येक रविवारी मौन धारण करून ‘गभस्ति’ नावाच्या सूर्याचे पूजन करावे. प्रत्येक सोमवारी अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि पाचवा सोमवार असल्यास सातू, हे ५ मुठी धान्य शिवपिंडीवर वहावे. मंगळवारी मंगलागौरीचे व्रत आणि पूजन करतात. बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पतिपूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि वरदलक्ष्मी व्रत, तसेच शनिवारी अश्वत्थमारुति पूजन करतात. याविषयीची अधिक माहिती सनातनच्या ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’ या ग्रंथात दिली आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. नारळी पौर्णिमा : ‘श्रावण पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ म्हणतात. नारळी पौर्णिमा सायाह्न व्यापिनी पाहिजे. दोन दिवस पौर्णिमा तिथी असेल, तर ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा असेल, त्या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी करावी. जर एकच दिवस पौर्णिमा तिथी असेल, तर त्याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी करावी. २२.८.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.३२ पर्यंत पौर्णिमा तिथी आहे.
२ आ. रक्षाबंधन : श्रावण पौर्णिमेला ‘रक्षाबंधन’ हा सण साजरा करतात. सूर्याेदयापासून सहा घटींपेक्षा (एक घटी म्हणजे २४ मिनिटे) जास्त कालावधीसाठी असलेल्या पौर्णिमेस रक्षाबंधन करावे. सहा घटींपेक्षा अल्प कालावधीसाठी पौर्णिमा असल्यास चतुर्दशीच्या दिवशी रक्षाबंधन करावे. रक्षाबंधनाच्या वेळेत भद्रा करण नसावे.’
(साभार : ‘२१ व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म’, प्रकाशक : श्री. अनंत (मोहन) धुंडीराज दाते)
२२.८.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.३२ पर्यंत पौर्णिमा तिथी आहे. त्या दिवशी सकाळी ६.१३ पर्यंत भद्रा (विष्टी करण) आहे. त्यानंतर रक्षाबंधन करू शकतो.
२ इ. शुक्लयजुः तैत्तिरीय हिरण्यकेशी उपाकर्म, श्यामाकाग्रयण : ‘श्रावण मासात श्रवण नक्षत्राच्या दिवशी करावयाच्या वैदिक विधीला ‘श्रावणी’ किंवा ‘श्रवणाकर्म’ म्हणतात. यालाच ‘उपाकर्म’ असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र हे श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते. त्या दिवशी किंवा पंचमीला किंवा हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा हा यजुर्वेदियांचा मुख्य काळ असून पंचमीच्या दिवशीसुद्धा उपाकर्म करता येते. हिरण्यकेशी उपाकर्मासाठी हस्त नक्षत्र आणि पौर्णिमा हे काळ आहेत. भाद्रपद मासातील हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. याविषयी काही विशेष नियम सांगितले आहेत. त्यांचा धर्मशास्त्रानुसार निर्णय घ्यावा लागतो. उक्तकाल हे रवि संक्रमणाने, पुण्यकालाने किंवा ग्रहणाने दूषित नसावेत.’ (साभार : ‘२१ व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म’, प्रकाशक : श्री. अनंत (मोहन) धुंडीराज दाते)
२ ई. हयग्रीवोत्पत्ति : श्रावण मासातील पौर्णिमेला हयग्रीवोत्पत्ति दिवस मानले जाते. हय म्हणजे अश्व आणि ग्रीव म्हणजे मान असलेली देवता. हयग्रीव या देवतेची बुद्धीदेवता म्हणून उपासना केली जाते. तिच्या मांडीवर लक्ष्मी विराजित असून चार हातांत शंख, चक्र, पद्म आणि पुस्तके आहेत.
२ उ. कन्यायन : २२.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.०४ नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) कन्या राशीत प्रवेश करत आहे.
२ ऊ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांना विलंब होण्याचा संभव असतो. २४.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.०७ पासून २५.८.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.१९ पर्यंत आणि २८.८.२०२१ या रात्री ८.५७ पासून २९.८.२०२१ या दिवशी सकाळी १०.१० पर्यंत विष्टी करण आहे.
२ ए. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदयसमयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २५.८.२०२१ या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ९.०६ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करावा. या दिवशी अथर्वशीर्ष, श्री गणेशस्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.
२ ऐ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २५.८.२०२१ या रात्री ८.४८ पासून दुसर्या दिवशी सायंकाळी ५.१४ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ओ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २५.८.२०२१ या दिवशी बुधवार असून सूर्याेदयापासून सायंकाळी ४.१९ पर्यंत तृतीया तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.
टीप १ – भद्रा (विष्टी करण), संकष्ट चतुर्थी, घबाड मुहूर्त, दग्ध योग, अन्वाधान आणि कुलधर्म यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१२.८.२०२१)