शांत स्वभावाची, साधनेची आवड असणारी, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली कु. मीरा राकेश परचुलकर (वय ११ वर्षे) !
बदलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मीरा राकेश परचुलकर हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. शांत स्वभाव
अ. मीरा एक मासाची असतांना मी तिला गुरुपौर्णिमेला घेऊन गेले होते. तेव्हा ती पूर्णवेळ काही त्रास न देता शांत राहिली होती. तिला घेऊन सेवेला किंवा सत्संगाला गेले, तरी ती शांत रहात असे.
आ. मीरा दोन वर्षांची असतांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तिला सहसाधकांजवळ ठेवून प्रसाराला गेले होते. तेव्हाही ती त्यांच्या समवेत आनंदाने राहिली.
इ. मीरा २ – ३ वर्षांची असतांना मी गुरुपौर्णिमेच्या प्रसाराच्या सेवेला गेल्यावर तिला घरी ठेवून जात असे. ती घरी कोणालाही त्रास न देता शांत रहायची. तिला ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवेला नेले, तर तिथेही ती एका जागी बसून रहायची.
ई. तिला कुणी रागावले, तर ती त्या व्यक्तीविषयी मनात राग धरत नाही.
२. उत्तम स्मरणशक्ती
मीराची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. ती ४ वर्षांची असतांना तिचे श्लोक आणि स्तोत्रे पाठ झाली होती. मीराची गणपतीवर दृढ श्रद्धा आहे.
३. आईच्या दुसर्या गर्भारपणात ‘भाऊ पाहिजे’, असे मीराने वारंवार सांगणे आणि आईला मुलगाच होणे
मी दुसर्या वेळी गरोदर असतांना ती ‘मला भाऊ हवा’, असे मला सांगायची. आम्ही समजावून सांगितले, तरी ती तसेच सांगायची आणि मला मुलगाच झाला.
४. आईला त्रास होत असतांना तिचे सांत्वन करणे
गरोदरपणी मला पुष्कळ त्रास व्हायचा. तेव्हा मीरा माझ्या डोक्यावर हात फिरवून ‘तुला बरे वाटेल हं’, असे मला म्हणायची.
५. स्वतःची कामे स्वतः करणे
ती ५ वर्षांची असतांना स्वतःची कामे स्वतःच करायची.
६. प्रेमभाव
ती भावाचीही (चि. श्लोक याची) छान काळजी घ्यायची. २०१९ या वर्षी मी काही मास कामाला जात होते. तेव्हा मीरा भावाचे दात घासणे, त्याला अंघोळ घालणे, जेवण भरवणे इत्यादी सर्व करायची. आताही मी सेवेला वा अन्य कामासाठी बाहेर गेल्यावर ती त्याची व्यवस्थित काळजी घेते.
७. सात्त्विकतेची आवड
मीराला ग्रंथ प्रदर्शनाच्या सेवेला जाणे, ग्रंथ वाचणे आणि नामजप करणे आवडते.
८. इतरांना साहाय्य करणे
आता दळणवळण बंदीच्या काळात ती मला प्रत्येक कामात साहाय्य करते. माझी प्रकृती बरी नसेल, तर ती आजीला सर्व कामात साहाय्य करते.
९. समजूतदारपणा
तिच्यामध्ये समजूतदारपणा आहे. आपली आवडती वस्तू ती समोरच्याला सहज देते.
१०. ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गात
सांगितल्याप्रमाणे साधनेविषयीच्या कृती करणे
अ. जेव्हापासून ती ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग पाहू लागली, तेव्हापासून ती स्वतःचे स्वभावदोष जाणून घेऊन त्यावर स्वयंसूचना देऊ लागली.
आ. ती ग्रंथाचे वाचन करून त्यात सांगितलेले सुसंस्कार आणि चांगल्या गोष्टी आचरणात आणू लागली.
ई. तिला देवतांच्या बोधपर गोष्टी ऐकायला आवडतात. तिला वास्तूशुद्धी आणि पूजा करायला आवडते.
११. स्वभावदोष
ती रात्री उशिरा झोपते आणि सकाळी उशिरा उठते.’
– सौ. मनाली राकेश परचुलकर (आई), बदलापूर, जिल्हा ठाणे.(जुलै २०२०)
|