अवजड वाहने वगळता अन्य वाहनांसाठी भुईबावडा घाटातील वाहतूक चालू
वैभववाडी – अवजड वाहने वगळता भुईबावडा घाट १९ ऑगस्टला सायंकाळी विलंबाने वाहतुकीसाठी चालू करण्यात आला. भुईबावडा घाटातून अवजड वाहतूक केल्यास संबंधित चालकावर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
कोकण-कोल्हापूर यांना जोडणार्या भुईबावडा घाटमार्गाला १३० मीटर लांबीची मोठी भेग पडल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. या ठिकाणी काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गावरून लहान वाहनांची वाहतूक चालू आहे; मात्र काही जणांनी अवजड वाहने नेण्यास प्रारंभ केल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने हा घाटमार्ग पूर्णत: बंद केला होता. (अवजड वाहने नेणार्यांच्या चुकीची अन्य जनतेला शिक्षा कशाला ? अवजड वाहनांवर कारवाई आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना काढून घाटमार्ग हलक्या वाहनांसाठी चालू ठेवता आला नसता का ? – संपादक) आगामी श्री गणेशचतुर्थीपूर्वी हा मार्ग वाहतुकीस चालू करावा, अशी मागणी ग्रामस्थ, प्रवासी आणि वाहनचालक यांच्याकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर भुईबावडा घाट अवजड वाहने वगळता हलक्या वाहनांसाठी चालू करण्यात आला आहे. (जनतेने मागणी केल्यावर घाटमार्ग चालू करणार्या प्रशासनाला स्वतःहून ते का लक्षात आले नाही ? – संपादक)