‘श्रीमंत’ नाव लावल्याने श्रीमंत होता येत नाही. विचाराने, कृतीने श्रीमंत’ असावे लागते ! – रूपाली पाटील-ठोंबरे, महिला शहराध्यक्ष, मनसे
पुणे, २० ऑगस्ट – ‘श्रीमंत’ नाव लावल्याने श्रीमंत होता येत नाही. विचाराने, कृतीने श्रीमंत असावे लागते. तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, तुम्ही कसले श्रीमंत ? जातीपातीचे राजकारण करून लोकांना जगू द्यायचे नाही, ही तुमची नीतीमत्ता आहे. हे दरिद्री विचार संपवा आणि विचाराने, कर्तृत्वाने श्रीमंत व्हा, असे श्रीमंत कोकाटेंच्या टीकेला महिला शहराध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांनी उत्तर दिले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमक चालू आहे.
श्रीमंत कोकाटे म्हणाले होते की, राज ठाकरेंना दादरमध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे, तसेच प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरू न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना ? त्यामुळे पुणे कुणाच्या बापाचे नाही, हे मनसेने लक्षात ठेवावे. मनसेच्या राज ठाकरेंना वाटत असेल की, पुरंदरेंना लोटांगण घातले म्हणून आपण पुष्कळ मोठे झालो, तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो.