देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. राहुल मोरे (वय ३५ वर्षे) यांचे आजारपण, उपचार आणि त्यांचे निधन यांच्या संदर्भात त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती !
१०.८.२०२१ या दिवशी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधक राहुल सदाशिव मोरे यांचे निधन झाले. आज २१.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. लहानपणापासून आजारी असूनही कुटुंबियांना कोणताही त्रास न देणे
‘राहुल ३ वर्षांचा असतांना त्याला पहिल्यांदा आकडी (फीट) आली. पुढील ४ वर्षांत त्यातून तो बरा झाला. तो नववीत शिकत असतांना पुन्हा त्याला आकडीमुळे त्रास झाला; पण नंतर तो बरा झाला होता. १६.६.२०२१ या दिवशी त्याला मोठ्या प्रमाणात आकडी आली. या कालावधीत त्याने पुष्कळ त्रास सहन केला. आम्हा कुटुंबियांना त्याचा त्याने कोणताही त्रास दिला नाही. ‘तो ईश्वर आणि गुरुमाऊली यांच्या अनुसंधानात राहून सर्व सहन करत होता’, याची आम्हा कुटुंबियांना वेळोवेळी अनुभूती येत होती.
२. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मुलाची अत्यवस्थ स्थिती स्वीकारता येणे
१७.७.२०२१ या दिवशी श्री. राहुल याला पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथे नेत असतांना प्रथम सद्गुरु सत्यवान कदम आणि नंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून नामजपादी उपाय मिळाले. रुग्णालयात त्याच्यावर वैद्यकीय उपचारांच्या समवेत नामजपादी उपायही चालू होते. तेथील आधुनिक वैद्यांनी सर्व परिस्थिती सांगितल्यावर आम्हाला मुलगा अत्यवस्थ असल्याचे समजले आणि ‘पुढे त्याचे काय होणार आहे ?’, हे कळूनही ती परिस्थिती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला अन् माझ्या पत्नीला (सौ. माधवी सदाशिव मोरे हिला) स्वीकारता आली.
३. ‘उपचारांचे देयक अनुमाने ६० ते ६५ सहस्र रुपये इतके होईल’, असे सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून आधुनिक वैद्यांना आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिल्यावर त्यांनी केवळ १० सहस्र रुपये घेणे
कोल्हापूर येथे रुग्णालयामध्ये आरंभीला ‘अनुमाने ६० ते ६५ सहस्र रुपये इतका व्यय येईल’, असे सांगितले. गुरुमाऊलीला (परात्पर गुरु डॉक्टरांना) प्रार्थना करून आधुनिक वैद्यांना मी आमची आर्थिक परिस्थिती सांगितली आणि देयक (बिल) न्यून करून देण्याची विनंती केली. आधुनिक वैद्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. त्यासंबंधी विचारपूस केल्यावर २० सहस्र ८३० रुपये इतके देयक झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले. तेवढी रक्कम जमा करण्यासाठी रुग्णालयातील रोखपालाकडे (कॅशियरकडे) दिल्यावर ती त्यांनी स्वीकारली. तेवढ्यात त्यांना दूरभाष आला. दूरभाष ठेवल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुमच्याकडून केवळ १० सहस्र रुपये घेण्यास सांगितले आहे.’’ त्यांनी आम्हाला १० सहस्र ८३० रुपये परत केले. हे केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच शक्य झाले.
४. निधनानंतर राहुलमधील चैतन्य वाढत असल्याचे जाणवणे
त्यानंतर राहुलला रुग्णालयातून घरी आणले. १०.८.२०२१ या दिवशी त्याचे देहावसान झाले. निधनापूर्वी आणि निधनानंतरही त्याचा तोंडवळा सतत प्रसन्नच जाणवत होता. निधनानंतरही तेथे उपस्थित असणार्या सर्वांनाच त्याच्यातील चैतन्य वाढत असल्याचे जाणवत होते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दाब जाणवत नव्हता.’
– श्री. सदाशिव मोरे (वडील), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (१४.८.२०२१)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आणि गुरुसेवेची तळमळ असलेले कै. राहुल मोरे !
कै. राहुल मोरे यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि देवगड येथील साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. सदाशिव कृष्णा मोरे (वडील) आणि सौ. माधवी सदाशिव मोरे (आई)
१. आवड-नावड अल्प
‘त्याचे खाण्याविषयी कोणतेही गार्हाणे (तक्रार) नसायचे. कोणताही पदार्थ तो आवडीने ‘प्रसाद’ म्हणून खायचा. त्याने कोणत्याही विशिष्ट खाद्यपदार्थासाठी कधी आग्रह धरला नाही.
२. प्रेमभाव
घरी कुणी आले, तरी राहुल त्यांची आदरपूर्वक विचारपूस करायचा. तो सर्वांशी प्रेमाने वागायचा.
३. सहनशीलता
त्याला पुष्कळ शारीरिक त्रास होता. अखेरच्या दिवसांत राहुलला रुग्णालयातील उपचारानंतर घरी आणल्यावर ‘घरामध्ये गंभीर रुग्णाईत कुणी आहे’, असे कधी वाटले नाही.
४. गुरुसेवेची तळमळ
दुकानात येणार्या-जाणार्यांना नामजपाचे महत्त्व सांगून नामजप करण्यास सांगणे, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने वितरण करणे, गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा अन् इतर उपक्रमांमध्ये तो सहभाग घेऊन भावपूर्ण सेवा करायचा.
५. घरातील कामे ‘आश्रमसेवा’ म्हणून करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करून आम्ही गृहप्रवेश केला होता. त्यामुळे तो घराला ‘आश्रम’ समजत असे. ‘घरातील केर काढणे, लादी पुसणे, भोजनानंतर स्वयंपाकघरातील आवराआवर करणे, रात्री सर्वांचे अंथरूण घालणे आणि सकाळी ते सर्व आवरणे’, या सेवा तो भावपूर्ण करायचा.
६. देव आणि गुरु यांच्याप्रती दृढ श्रद्धा
राहुलची श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा होती. त्यांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, या कृती त्याच्याकडून सतत होत होत्या. आजारपणात त्याच्या अंथरूणाच्या शेजारी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ ठेवला होता. त्याकडे तो एकटक पाहून गुरुदेवांच्या अनुसंधानात असायचा.’
(१७.८.२०२१)
सौ. कल्पना शहाकार, जामसंडे, देवगड.
‘राहुलचा मृत्यू झाला, त्या दिवशी त्यांच्या घरात दाब न जाणवता चैतन्य जाणवत होते.’ (१७.८.२०२१)
श्री. अनंत परुळेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), श्री. विजय पवार, सौ. स्मिता पवार आणि श्रीमती विशाखा मांजरेकर
१. ‘राहुल मोरे हा शांत, संयमी आणि मितभाषी होता.
२. साधनेचे गांभीर्य असणे : तो सदैव नामजप आणि सेवा यांत मग्न असायचा. तो मोरेकाका आणि काकू यांना (त्याच्या आई-वडिलांना) सेवेत साहाय्य करायचा. तो नेहमी आनंदी असायचा.’
(१७.८.२०२१)
श्री. शेखर इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), देवगड
१. एखाद्याकडून चूक झाली असेल, तर तो त्याला शांतपणे सांगायचा.
२. त्याचे लहानसे दुकान होते. तेथे आलेल्या ग्राहकांना तो नामजपाचे महत्त्व सांगायचा.
३. तो ठरलेल्या वेळेत सेवेसाठी उपस्थित रहायचा आणि त्याला दिलेली सेवा भावपूर्ण करायचा.
४. ‘अखेरच्या अवस्थेत त्याची अंतर्मनातून साधना चालू आहे’, असे जाणवायचे.’
(१७.८.२०२१)