वाहतुकीसाठी बंद असलेला भुईबावडा घाट श्री गणेशचतुर्थीपूर्वी चालू करण्याची मागणी
वैभववाडी – कोकण-कोल्हापूर यांना जोडणार्या भुईबावडा घाटमार्गाला १३० मीटर लांबीची मोठी भेग पडल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. या ठिकाणी काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गावरून छोट्या वाहनांची वाहतूक चालू आहे; मात्र आता काही जणांनी अवजड वाहने नेण्यास प्रारंभ केल्याने सावधानतेची उपाययोजना म्हणून प्रशासनाने हा पर्यायी घाटमार्गही पूर्णत: बंद केला आहे. आगामी श्री गणेशचतुर्थीपूर्वी हा मार्ग वाहतुकीस चालू करावा, अशी मागणी ग्रामस्थ, प्रवासी आणि वाहनचालक यांच्याकडून होत आहे.
तालुक्यातील करूळ घाटात रस्त्याचा काही भाग खचल्याने पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटातून वाहतूक चालू होती; मात्र सतत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे आता भुईबावडा घाट धोकादायक झाल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच करूळ घाटमार्ग वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे; मात्र भुईबावडा दशक्रोशीतील एखादा रुग्ण आजारी असेल आणि त्याला कोल्हापूरमधील रुग्णालयात भरती करायचे असल्यास त्याच्या नातेवाईकाला ४० कि.मी. चा वळसा मारावा लागत आहे. त्यातच आता कोकणातील मोठा सण असलेला गणेशोत्सव तोंडावर आल्याने या मार्गाने कोकणात येणार्या श्री गणेशभक्तांची संख्या मोठी असते. त्यामुळे श्री गणेशचतुर्थीपूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी योग्य करावा, अशी मागणी होत आहे.