शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम ! – शिक्षकांचा सर्वेक्षणातील निष्कर्ष


म्हापसा, १९ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यालय आणि शिक्षक यांच्यापासून बराच काळ दूर राहिल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम होत आहे, असा निष्कर्ष शिवोली येथील शिक्षकांनी सर्वेक्षणाद्वारे काढला आहे.

शिवोली येथील कीर्ती विद्यालयाच्या शिक्षिका पूजा वाडकर आणि कनिका कोरगावकर यांनी हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाविषयी अधिक माहिती देतांना म्हापसा येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत कीर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदेश कोचरेकर म्हणाले, ‘‘शिक्षकांनी इयत्ता १० वीतील अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क करून १४ पानी सर्वेक्षण अहवाल सिद्ध केला आहे. यामध्ये विविध अंगांनी सूत्रे मांडण्यात आली आहेत, तसेच यावर उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत भ्रमणभाष वापरतात आणि यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम झालेला आहे. शाळा असल्यास मुले लवकर उठतात; मात्र आता प्रत्यक्ष वर्ग भरत नसल्याने मुले सकाळी ९ वाजेपर्यंत झोपून रहातात. एकंदरीत दिनक्रमात पालट झाल्याने त्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. काही मुलांमध्ये स्थुलता दिसू लागली आहे. भ्रमणभाष जोडणीचा (कनेक्टिव्हिटीचा) अभाव असणे, भ्रमणभाष खरेदी करण्यासाठी पालकांची होत असलेली ओढाताण आदी अनेक कारणांमुळे मुलांच्या मनावरही परिणाम झालेला आहे. हा सर्वेक्षण अहवाल लवकरच शासनाला सुपुर्द केला जाणार आहे. सध्या वीज आणि पाणी विनामूल्य देण्याची घोषणा राजकीय पक्षांकडून केली जात आहे. याच धर्तीवर मुलांना शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी ‘इंटरनेट’ सेवा विनामूल्य द्यावी.’’ या पत्रकार परिषदेला शिक्षिका पूजा वाडकर आणि कनिका कोरगावकर यांचीही उपस्थिती होती.