समाजाला ‘विवेक’ शिकवणारी अंनिस स्वत: मात्र गटबाजीने पोखरली !

विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा डंका पिटणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज अंतर्गत कुरघोडींनी ग्रासली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणार्‍यांचा शोध लागावा, यासाठी ही मंडळी एकजुटीने काम करतील, अशी समाजाची धारणा होती; मात्र डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दुखवट्याच्या काळापर्यंतही संयम न दाखवता अंनिसमध्ये गटबाजी चालू झाली. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या संस्थापकांची हत्या करणार्‍यांचा शोध लागावा, यासाठी एकजूट दाखवण्याऐवजी अंनिसचे ‘ट्रस्टी’ आणि संघटनेचे पदाधिकारी परस्परांमधील हेवेदाव्यांमध्ये अडकले आहेत. अशी मंडळी समाजाला नेमकी कोणती दिशा देणार ? हा प्रश्न आहे. विवेकवादाच्या फुशारक्या मारणार्‍या या अंनिसवाल्यांचे खरे स्वरूप जनतेला कळावे, यासाठी हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत. यातून प्रत्येक ठिकाणी विवेकाचा बागूलबुवा उभा करून जनतेचा देव आणि धर्म यांवरील विश्वास उडवणार्‍या अंनिसची विश्वासार्हता किती आहे ? हे आता समाजानेच ठरवावे !

संकलक : श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

श्री. प्रीतम नाचणकर

डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर ‘ट्रस्ट’च्या कार्याध्यक्षपदासाठी अंनिसच्या अंतर्गत कुरघोडी !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच त्यांची पत्नी श्रीमती शैला दाभोलकर यांना अंनिसच्या ‘ट्रस्ट’च्या कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. डॉ. दाभोलकर यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे सक्षम पदाधिकारी अंनिसमध्ये असतांना कार्यात सक्रीय नसलेल्या श्रीमती शैला दाभोलकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच श्रीमती शैला दाभोलकर यांना कार्याध्यक्ष करण्यासाठी एवढी घाई का करण्यात आली ? यामध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांना ‘ट्रस्ट’पासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न लपून रहात नाही. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सहानुभूतीवर त्यांच्या पत्नीला कार्याध्यक्ष करून त्याला अंतर्गत विरोध टाळण्याची दक्षता ‘ट्रस्ट’कडून घेण्यात आली. संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ‘‘ट्रस्ट’ आणि संघटना यांमध्ये समन्वयासाठी दोन्हींचे कार्याध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे असावे’, असे मत व्यक्त केले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

दबाव आणून डॉ. हमीद दाभोलकर यांना, तर ट्रस्टची प्रक्रिया डावलून मुक्ता दाभोलकर यांना संघटनेत घेण्यात आल्याचा आरोप

श्रीमती शैला दाभोलकर यांची ‘ट्रस्ट’च्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यावर त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा डॉ. हमीद काम पहातो. ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून संघटनेवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत’, असा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या जवळच्या लोकांकडून दबाव आल्यामुळे हमीद दाभोलकर यांना संघटनेत प्रवेश देण्यात आला. डॉ. दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांना ट्रस्टची सर्व प्रक्रिया डावलून अंनिसच्या नियतकालिकाच्या संपादक मंडळात घेण्यात आले आणि त्यानंतर संघटनेला माहिती देण्यात आली. या सर्व घडामोडी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर वर्षभरात करण्यात आल्या.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर अंनिसमध्ये घराणेशाही आणण्याचा हा प्रयत्न आहे का ? कि अविनाश पाटील यांची डॉ. दाभोलकर यांच्यानंतर अंनिसवर स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही धडपड आहे ?

अंनिसच्या आर्थिक व्यवहाराविषयी अविनाश पाटील यांच्याकडून संशय व्यक्त

‘‘ट्रस्ट’ ही एक ‘फंडिग एजन्सी’ (पैसे पुरवणारी संस्था) म्हणून काम करू इच्छिते. यात काही लोकांना त्यांचे हितसंबंध जोपासायचे आहेत’, असा थेट आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. ‘ट्रस्ट’मध्ये ५-६ कोटी रुपये जमा आहेत. हा पैसा लोकांनी विश्वासाने ‘ट्रस्ट’कडे जमा केला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत, ‘ट्रस्ट’च्या विश्वस्तांना नव्हे. संघटना आणि ‘ट्रस्ट’ यांच्यामध्ये काही समन्वय असावा, यासाठी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर आम्ही प्रयत्न केला. त्या वेळी त्याला विरोध झाला’, असे अविनाश पाटील यांनी पुढे म्हटले आहे. यातून अंनिसच्या आर्थिक व्यवहाराविषयी अविनाश पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे. सद्यःस्थिती पहाता दोन्हीपैकी एक गोष्ट खरी असेल किंवा दोन्ही खर्‍या असतील. असे काहीही असले, तरी हे विवेकाला धरून आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

जनतेला सांगता ती ‘सद्सद्विवेकबुद्धी’ हीच का ?

दाभोलकर कुटुंबियांकडून संघटनेला समांतर निर्णय प्रक्रिया चालू आहे. याविषयी हमीद दाभोलकर यांना विचारणा केल्यावर त्यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र पाठवून संघटनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अंनिसचे ज्येष्ठ सहकारी, दाभोलकर कुटुंबीय, अंनिसचे अध्यक्ष प्रतापराव पवार या सगळ्यांशी चर्चा झाली; परंतु दाभोलकर कुटुंबियांवर असलेले आक्षेप बाजूला ठेवून ‘ट्रस्ट’ला संघटनेच्या विरोधात उभे करण्यात आले. कार्यकर्त्यांचे मानधन ‘ट्रस्ट’ने थांबवले’, असे स्वत: कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे आपापसांतील हेवेदावे, पद, अधिकार, हितसंबंध यांत अडकलेले हे अंनिसवाले समाजात जाऊन नेमक्या कोणत्या ‘विवेका’च्या गोष्टी करतात ? जनतेला सांगता ती सद्सद्विवेकबुद्धी हीच का ?

‘ट्रस्ट’मधील आर्थिक अनियमिततेला अविनाश पाटील यांनी डॉ. दाभोलकर यांनाच अप्रत्यक्ष उत्तरदायी ठरवणे !

‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आर्थिक आणि कायदेशीर गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा म्हणून डॉ. दाभोलकर यांनी समितीच्या नावानेच एक ‘ट्रस्ट’ स्थापन केला होता. संघटनेच्या कामासाठी येणार्‍या देणग्या या ‘ट्रस्ट’मध्ये गोळा होत. त्याचा कारभार डॉ. दाभोलकर असेपर्यंत संपूर्णपणे तेच बघत होते. येणार्‍या देणग्या, व्यय, हिशोब हे स्वत: डॉ. दाभोलकर बघत होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपर्यंत ही स्थिती अशीच होती. मला तोपर्यंत असा एक ‘ट्रस्ट’ आहे, या पलीकडे त्यातील व्यवहारांची काहीही माहिती नव्हती’, असे अविनाश पाटील यांनी दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितले आहे. ‘डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूपर्यंत ‘ट्रस्ट’चा सर्व व्यवहार तेच पहात होते’, हे प्रसिद्धीमाध्यमांना सांगतांना

‘आपण स्वत: निर्दाेष आहोत’, हे अविनाश पाटील यांना सांगायचे आहे; कारण डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर ‘ट्रस्ट’च्या आर्थिक व्यवहारांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याचे अविनाश पाटील यांनी म्हटले आहे. भविष्यात ‘ट्रस्ट’मधील आर्थिक अपहार उघड झाल्यास स्वत:ची बाजू अविनाश पाटील सुरक्षित करून घेत आहेत; मात्र हे करत असतांना या तांत्रिक त्रुटींना अविनाश पाटील यांनी एक प्रकारे डॉ. दाभोलकर यांना उत्तरदायी ठरवले आहे. अविनाश पाटील हे सांगत असलेली ही माहिती खरी कि खोटी ? हे सांगायला डॉ. दाभोलकर आता हयात नाहीत.

डॉ. दाभोलकर यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे अविनाश पाटील हयात असलेल्यांची नावे का घेत नाहीत ?

अविनाश पाटील

‘वर्ष २०१३ नंतर म्हणजे डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर संघटनेच्या विरोधात तक्रारी आल्या. त्यानंतर मी ‘ट्रस्ट’चे काम आणि आर्थिक व्यवहार यांविषयी माहिती करून घेतली. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्या’, असे अविनाश पाटील यांनी म्हटले आहे. या तांत्रिक त्रुटी कोणत्या ? हे साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले आहेच.

परदेशातून मिळालेल्या लाखो रुपयांच्या देणग्या डॉ. दाभोलकर यांच्या नावे आल्या आहेत. त्या देणग्या न्यासाला दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे; मात्र प्रत्यक्षात न्यासाच्या हिशोबात त्याची नोंद नाही. परदेशातून मोठ्या प्रमाणात मिळालेल्या देणग्यांविषयीची माहिती केंद्रीय गृहविभागाला देण्यात आलेली नाही.

स्थावर मिळकत आणि जंगम मिळकत यांविषयी अद्ययावत् नोंदी ठेवलेल्या नाहीत. विश्वस्त आणि संस्था यांना मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या देणग्यांचे ठराव उपलब्ध नाहीत, अशी कोट्यवधी रुपयांची अनियमितता अंनिसच्या ‘ट्रस्ट’च्या हिशोबात आढळून आल्याचा अहवाल साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे.

भविष्यात याचे अन्वेषण पोलीस करतीलच; पण या सर्वांसाठी अविनाश पाटील यांनी अप्रत्यक्षपणे डॉ. दाभोलकर यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. हयात नसलेल्या डॉ. दाभोलकर यांना आरोपी ठरवतांना दुसरीकडे सध्या ‘ट्रस्ट’मध्ये कार्यरत असलेल्या एकाचेही नाव अविनाश पाटील यांनी घेतलेले नाही. ‘ट्रस्ट’मधील काही लोक स्वत:चे हितसंबंध साधत आहेत’, असा आरोप त्यांनी केला आहे. स्वत:च्या हितसंबंधांसाठी ‘ट्रस्ट’चा उपयोग करणार्‍यांची नावे मात्र अविनाश पाटील का उघड करत नाहीत ? अविनाश पाटील जर स्वत: स्वच्छ प्रतिमेचे असतील, तर ‘ट्रस्ट’ची हानी करणार्‍यांची नावे त्यांनी निर्भयपणे सांगणे अपेक्षित आहे, तसे नसेल, तर अविनाश पाटील यांचाही यात हात आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो.

अंतर्गत कुरघोडींमुळे ‘ट्रस्ट’ला डावलून संघटनेकडून नवीन मासिक चालू !

अंनिस ‘ट्रस्ट’ आणि संघटना यांचे वर्ष १९९० पासून ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक चालू आहे; मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांना डावलण्यात येत असल्यामुळे संघटनेकडून ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ हे स्वतंत्र मासिक चालू करण्यात आले आहे. जुलै २०२१ मध्ये या मासिकाचा ‘ऑनलाईन’ प्रकाशन सोहळा करण्यात आला; मात्र या सोहळ्यामध्ये दाभोलकर कुटुंबियांना डावलण्यात आले.

‘ट्रस्ट’कडून संघटनेची आर्थिक कोंडी झाल्यास संघटनेला स्वतंत्र ‘ट्रस्ट’ची निर्मिती करण्याचा पर्याय !

अंनिसच्या कार्याला प्राप्त होणारा निधी हा अंनिसच्या ‘ट्रस्ट’मध्ये जमा होतो; मात्र सद्यःस्थितीत ‘ट्रस्ट’कडून संघटनेच्या पदाधिकार्‍यांना डावलण्यात येत आहे. अविनाश पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर संघटनेच्या वतीने मुंबईत साजर्‍या करण्यात आलेल्या त्रिदशकपूर्ती सोहळ्याला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाला अपेक्षित व्ययाच्या दुप्पट निधी जमा केला; मात्र त्यासाठी लागणारा व्यय ‘ट्रस्ट’कडून देण्यात आला नाही. त्यामुळे पदाधिकार्‍यांना त्यांच्या खिशातून पैसे भरावे लागले. अविनाश पाटील यांच्या म्हणण्यात तथ्य असेल, तर संघटनेला स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतंत्र ‘ट्रस्ट’ची निर्मिती करण्यावाचून पर्याय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे, असे वाटते.

‘शहीद’ उपाधी लावून दाभोलकर यांच्या हत्येचे भांडवल !

‘शहीद’ हा शब्द ‘हुतात्मा’ अर्थाने वापरला आहे. सीमेवर शत्रूशी लढतांना वीरमरण आलेल्या सैनिकाला ‘शहीद’ (हुतात्मा) हा शब्द वापरला जातो; परंतु ‘मॉर्निंग वॉक’ करतांना हत्या झालेल्या व्यक्तीचे ‘शहीद’ असे उदात्तीकरण कशासाठी ? म. गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या मोठ्या नेत्यांच्याही हत्या गोळ्या घालून झाल्या; मात्र राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधान असूनही त्यांना कुणीही ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ हा शब्द लावला नाही. याचा अर्थ त्यांच्याविषयी अनादर आहे म्हणून नव्हे, तर त्या शब्दाचा एक मान आणि गौरव आहे म्हणून. डॉ. दाभोलकर यांना ‘शहीद’ घोषित करून अंनिसवाल्यांनी मात्र त्यांच्या मृत्यूचेही भांडवल केले आहे.

 अंनिसमधील दुफळी शाम मानव यांच्या वाटेवर…

शाम मानव

‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी अंनिसमधील दुफळीला दुजोरा देतांना म्हटले, ‘विरोधी मत व्यक्त करणार्‍याला बाहेर काढण्याची अविनाश पाटील यांची कार्यपद्धती आहे. माध्यमांमध्ये दाभोलकर कुटुंबीय प्रकाशझोतात येणे, हे अविनाश पाटील यांना आवडत नव्हते. त्यांना महत्त्व मिळत नसल्याने त्यांचा अहंकार सातत्याने डोकावत होता. यापूर्वी शाम मानव यांच्या अशाच कार्यपद्धतीमुळे अंनिसमध्ये फूट पडली. त्यांनी समितीची कार्यकारिणी बरखास्त केली. डॉ. दाभोलकर यांच्याशी फारकत घेऊन शाम मानव यांनी स्वत:ची ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ स्थापन केली होती.’ अंनिसमधील सद्यःस्थिती पहाता अविनाश पाटील यांची वाटचाल शाम मानव यांच्याप्रमाणे होत असल्याचे दिसून येते आहे.

संघटनेमध्ये अशा प्रकारे स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपडणार्‍या या मंडळींनी समाजात जाऊन विवेकाच्या गोष्टी करणे, म्हणजे समाजाची दिशाभूलच करणे होय. अंनिसची ही भोंदूगिरी आता समाजापुढे उघड होत आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, असे अंनिसवाले म्हणतील, तेव्हा ते कोणत्या विवेकाच्या गोष्टी बोलत आहेत ? याची विचारणा समाजाने त्वरित करायला हवी, असे वाटते.