डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण योग्य प्रकारे होत नसून त्याला जाणीवपूर्वक वेगळी दिशा दिली जात आहे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद ‘दाभोलकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’
कोल्हापूर – अन्वेषण यंत्रणांकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात वर्ष २०१३ पासून सातत्याने आरोपी पालटत गेले. या प्रकरणात प्रथम अटक करण्यात आलेल्या खंडेलवाल आणि नागोरी यांचे पुढील अन्वेषणात नावच गायब झाले. वर्ष २०१६ मध्ये सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ‘मास्टरमाईंड’ ठरवून सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्या, असा दावा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने केला. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांनी गोळ्या झाडल्या, असा दावा केला. ८ वर्षांत सतत पालटणारे आरोपी आणि नवनवीन दावे यांमुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण योग्य प्रकारे होत नसून त्याला जाणीवपूर्वक वेगळी दिशा दिली जात आहे. त्यामुळे एकूणच अन्वेषण यंत्रणांच्या अन्वेषणाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. ते १८ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘दाभोलकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते. या संवादात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनीही त्यांचे विचार मांडले. या संवादाचे सूत्रसंचालन श्री. नरेंद्र सुर्वे आणि श्री. कार्तिक साळुंखे यांनी केले. ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब लाईव्ह’ यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात आलेला हा संवाद १२ सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिला.
(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)