संभाजीनगर येथील सुपुत्र मेजर साकेत पाठक यांना ‘सेना मेडल’ घोषित !
चकमकीत घायाळ होऊनही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात !
संभाजीनगर – येथील सुपुत्र मेजर साकेत पाठक यांना त्यांनी लष्करात बजावलेल्या अतुलनीय सेवेविषयी ‘सेना मेडल’ घोषित झाले आहे. पुलवामा येथे ८ एप्रिल २०२१ या दिवशी आतंकवाद्यांसमवेत झालेल्या कारवाईच्या वेळी त्यांनी दाखवलेल्या शौर्याची नोंद घेत भारतीय लष्कराच्या वतीने हे ‘मेडल’ लवकरच त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सध्या मेजर साकेत ‘४४ आर्.आर्. बटालियन’मध्ये आहेत.
शहरातील सिडको भागातील रहिवासी श्री. प्रकाश आणि सौ. ज्योती पाठक यांचे मेजर साकेत पुत्र आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुकुल मंदिर आणि कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे झाले आहे. बालपणापासूनच हुशार असलेले मेजर साकेत यांनी सिंकदराबाद येथील लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डेहराडून येथील ‘इंडियन मिल्ट्री अकॅडमी’त आपले लष्करी अधिकारीपदाचे प्रशिक्षण घेतले होते. वर्ष २०१४ मध्ये लष्करात रूजू झाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि पंजाब राज्यांत विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. ते सियाचीन येथेही कार्यरत होते.
आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत मेजर साकेत घायाळ झाले होते; परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने त्यावर मात केली आहे’, अशी माहिती श्री. प्रकाश पाठक यांनी दिली. लष्कराने स्वातंत्र्यदिनी घोषित केलेल्या या पदकाविषयी त्यांची आई सौ. ज्योती पाठक यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘लष्करात ‘करिअर’ करावे, अशी साकेत याची बालपणापासूनची इच्छा होती. तो करत असलेल्या देशसेवेचा आम्हाला आभिमान आहे’, असे त्यांनी सांगितले.