संवाद : पंतप्रधान आणि खेळाडू यांचा !

संपादकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी देहलीमध्ये टोकियो येथील ऑलिंपिक खेळून परतलेल्या १२७ भारतीय खेळाडूंशी नुकताच प्रत्यक्ष संवाद साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी देहलीमध्ये टोकियो येथील ऑलिंपिक खेळून परतलेल्या १२७ भारतीय खेळाडूंशी नुकताच प्रत्यक्ष संवाद साधला. न्याहारीचे औचित्य साधून त्यांनी एका वडीलधारी व्यक्तीसम सर्व प्रतिभावान खेळाडूंना दिशादर्शन केले. देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने केलेली ही हितगुज निश्चितच सर्वांना प्रेरणादायी होती. या माध्यमातून प्रत्येक खेळाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. भालाफेकीत सुवर्णपदक मिळवणारे नीरज चोप्रा यांचे कौतुक करतांना पंतप्रधान म्हणाले, ‘विजयाचा तुझ्या डोक्यावर कधीच परिणाम होत नाही, तसेच तू पराजय तुझ्या मनात ठेवत नाहीस ! यामुळेच तू विशेष कामगिरी करू शकलास !’ पंतप्रधानांच्या या वाक्यातून प्रत्येकच भारतीय नागरिकाला त्याच्या क्षेत्रामध्ये चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली असणार. काही खेळाडूंनी सांगितले की, आम्ही पुष्कळ प्रयत्न केले; परंतु देशासाठी पदक मिळवण्यात आम्हाला अपयश आले. आमच्या मनावर दबाव होता. त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. यावर पंतप्रधानांनी त्यांचे दिशादर्शन करत ‘तुम्ही एवढ्या लहान वयात ऑलिंपिक स्तरापर्यंत पोचू शकला, हे काय कमी आहे का ? पुढील वेळी प्रयत्न करा. तुम्हाला निश्चितच यश मिळेल’, असे सांगितले. त्यांच्या या वाक्यांतून खेळाडूंत वैचारिक सुस्पष्टता निर्माण होते, तसेच वास्तवाचा विचार करता अनेक भारतीय खेळाडू ऑलिंपिक स्तरापर्यंत पोचतात; पण त्यांना अन्य देशांप्रमाणे अपेक्षित यश मिळत नाही. त्यांच्या मनावर असलेल्या तणावामुळे स्वत:ची सर्वाेत्तम खेळी करण्यात मर्यादा येते. यासाठी खेळाडूंनी स्वभावदोष आणि अहंकार दूर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच दैवी पाठबळ मिळण्यासाठी खेळाच्या सरावासमवेत नामजपादी साधना करणेही आवश्यक आहे. यासाठी व्यस्त दिनक्रमात साधनेसाठी काही वेळ ठेवणे हितावह आहे. याने केवळ खेळाडूच नव्हे, तर प्रत्येक नागरिक आपल्या व्यावहारिक जीवनात यश प्राप्त करू शकेल. यातून देशाचे भवितव्य दैदीप्यमान होऊ शकेल. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेऊन समाजाला साधना करण्यास कशाप्रकारे प्रवृत्त करता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी यासाठी काहीच केले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. असो. पंतप्रधानांच्या या भेटीत एका खेळाडूशी बोलतांना ते म्हणाले की, आता चातुर्मास चालू असल्याने मी एकाच वेळी अन्नग्रहण करतो. यातून त्यांनी हिंदु धर्माचरणाचे महत्त्व प्रतिपादिले. ते कौतुकास्पद होते. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांच्या कोरियाई प्रशिक्षकांशी संवाद साधतांना त्यांनी कोरिया आणि अयोध्या यांच्यातील ऐतिहासिक संबंधाविषयी आवर्जून माहिती देत अयोध्येला भेट देण्याविषयी त्यांना सांगितले. थोडक्यात पंतप्रधानांच्या या भेटीतून भारतीय समाजात विविध संदेश गेले आहेत. धर्माचरण, हिंदुत्व, क्रिकेट सोडून अन्य खेळांना प्रोत्साहन आदी गोष्टी जमेच्या बाजू आहेत. आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या तुलनेत मोदी यांनी निर्माण केलेले हे आगळे वेगळे उदाहरण सर्वांना दिशादर्शक राहील, हेच खरे !