रामनाथी आश्रमात नवीन चारचाकी गाडीचे पूजन चालू असतांना ‘वाहनदेवता संतांच्या हस्ते गंध, पुष्प आदी उपचार करवून घेण्यासाठी कृतज्ञताभावाने उभी आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे
‘२९.१२.२०१९ या दिवशी आम्ही नवीन चारचाकी गाडी विकत घेतली आणि तिची पूजा करण्यासाठी ती रामनाथी आश्रमात आणली. आश्रमातील सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ गाडीची पूजा करतांना मी शेजारीच उभी होते. त्या वेळी ‘आता सेवेमध्ये साहाय्य करण्यासाठी आणखी एक वाहन आपल्या कुटुंबात आले आहे’, या विचाराने मला गुरूंप्रती कृतज्ञता वाटली. तेव्हा माझ्याकडून सहजतेने प्रार्थना केली गेली, ‘हे वाहनदेवते, सनातनच्या या कुटुंबामध्ये तुझे स्वागत आहे. यापुढे आम्हा सर्वांना साधना आणि सेवा करण्यासाठी तू साहाय्य करणारी हो.’ तेव्हा मला चारचाकी गाडीच्या समोर एखाद्या देवीप्रमाणे साडी नेसून उभी असलेली वाहनदेवता दिसली. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘ती संतांच्या हस्ते गंध, पुष्प आदी उपचार करवून घेण्यासाठी कृतज्ञताभावाने उभी आहे, तसेच ती ‘तुमच्यामुळे मला या सनातनच्या कुटुंबात सहभागी होऊन सेवा करण्याची संधी मिळाली, म्हणून मी कृतज्ञ आहे’, असे सांगत आहे.’
हे गुरुदेवा, ‘निर्जीव वस्तूंमध्येही देवत्व निर्माण करण्याचे सामर्थ्य या आश्रमात आहे’, याची अनुभूती आपल्याच कृपेने मला घेता आली, यासाठी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. राघवी कोनेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१.२०२०)
|