५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अवनी मयूर मराठे (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अवनी मराठे एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पुणे गावठाण येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. विजया भिडे यांची मोठी मुलगी सौ. कांचन या लग्नापूर्वी नामजप करणे, अंक वितरण करणे, गुरुपौर्णिमेच्या सेवेत सहभागी होणे इत्यादी सेवा करत असत. त्यांनी काही मास रामनाथी आश्रमातही कलेशी संबंधित सेवा केली आहे. सौ. कांचन यांची प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा आहे. विवाहानंतरही त्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मुलीच्या जन्माच्या वेळी गर्भारपणी आईने साधनेचे जे प्रयत्न सांगितले, ते सौ. कांचन यांनी मनापासून केले. चि. अवनी हिचा तिथीने २२.६.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. त्यांच्या मुलीच्या जन्मापूर्वी आणि जन्म झाल्यानंतर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
१. गर्भधारणेपूर्वी
१ अ. लग्नानंतर मुलीचे ५ वर्षे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य असूनही दिवस जाण्यास अडचण येणे : ‘माझ्या मोठ्या मुलीच्या (सौ. कांचन मराठे हिच्या) लग्नाच्या वेळी ज्योतिषी कै. गोडबोले यांनी तिची पत्रिका पाहून सांगितले, ‘‘पत्रिका जुळतेय; मात्र संतती उशिरा होणार आहे; पण जी संतती होईल, ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असेल.’’ त्याप्रमाणे लग्नानंतर ५ वर्षे मुलीचे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य (नॉर्मल) असूनही दिवस जात नव्हते.
१ आ. सौ. प्राजक्ता जोशी यांनी जप करण्यास सांगणे आणि जप केल्यानंतर मुलगी गर्भवती रहाणे : मे २०१८ मध्ये एक दिवस महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख ‘ज्योतिष फलित विशारद’ सौ. प्राजक्ता जोशी (पू. सौरभदादांच्या आई) या आमच्या घरी निवासासाठी होत्या. त्याच वेळी सौ. कांचनही उपचारांसाठी घरी रहायला आली होती. त्या वेळी सौ. प्राजक्ता जोशी यांनी तिला काही जप करायला सांगितले होते. ते जप तिच्यासह यजमानांनीही केल्यानंतर तिला दिवस राहिले.
२. गर्भधारणा झाल्याची पूर्वसूचना
ऑगस्ट २०१८ मध्ये सौ. प्राजक्ता जोशी आमच्याकडे आल्या होत्या. तेव्हा राखीपौर्णिमा असल्याने सौ. कांचन आणि कु. पूर्वा (माझी धाकटी मुलगी) यांनी पू. सौरभदादांसाठी त्यांच्याकडे राखी दिली. ‘पू. सौरभदादांना राखी बांधल्यानंतर ते ‘‘कांचन बाळ, बाळ’’ असे म्हणत होते’, असे प्राजक्ताताईंनी आम्हाला भ्रमणभाष करून सांगितले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘याचा अर्थ पुढच्या राखीपौर्णिमेपर्यंत तुमच्या मांडीवर नातवंड असणार आहे.’’
(प्रत्यक्षातही तसेच घडले. यातून ‘संत त्रिकालदर्शी असतात’, हे दिसून येते. – संकलक)
त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये मला आणि पूर्वाला एकाच दिवशी स्वप्न पडले की, ‘कांचनला बाळ झाले आहे.’ दुसर्याच दिवशी कांचनने तिला गर्भधारणा झाल्याचे सांगितले.’
– सौ. विजया मिलिंद भिडे (चि. अवनीची आजी, आईची आई), पुणे
२ अ. नातीच्या जन्माच्या आधी माझ्याकडून पुढील प्रार्थना नियमित होत असे, ‘हे गुरुदेवा, हे परमेश्वरा, कांचनला आरोग्यसंपन्न, बुद्धीमान आणि ईश्वरनिष्ठ अपत्य होऊ दे.’
– श्री. मिलिंद भिडे (चि. अवनीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले आजोबा, आईचे वडील), पुणे
३. गर्भारपणात आलेल्या अनुभूती
३ अ. ‘सतत ईश्वरी चैतन्य घरात आहे’, असे वाटणे : घरात बाळ येणार आहे, हे समजल्यापासून घरातील वातावरण एकदम पालटले. ‘आपल्या घरात सतत ईश्वरी चैतन्य आहे’, असे वाटायचे.
३ आ. एका गुरुवारी घरात दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवले, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्वही जाणवत होते.
३ इ. ‘आनंदाची बातमी आहे’, असे म्हणून संतांनी आशीर्वाद देणे : कांचन २ मासांची गरोदर असतांना परिचयातील एक संत आमच्या घरी आले होते. आम्ही त्यांना मुलीविषयी (कांचनविषयी) स्वतःहून काही सांगितले नव्हते. कांचन त्यांना नमस्कार करत असतांना त्यांनी ‘आनंदाची बातमी आहे’, असे म्हणून तिला आशीर्वाद दिला.
४. गर्भारपणी केलेली उपासना आणि सेवा
४ अ. चौथा मास
४ अ १. ‘बाह्य औषधांनी शरीर चांगले होईल; पण मन आणि बुद्धी प्रगल्भ होण्यासाठी ज्ञानेश्वरीचे वाचन पाहिजे’, असे एका संतांनी सांगितल्यावर मुलीने प्रतिदिन ज्ञानेश्वरीतील १०० ओव्या वाचणे : आमच्या परिचयातील एका संतांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘‘बाह्य औषधांनी शरीर चांगले होईल; पण मन आणि बुद्धी प्रगल्भ होण्यासाठी ज्ञानेश्वरीचे वाचन पाहिजे.’’ त्यानुसार चौथा मास लागल्यापासून कांचन प्रतिदिन ज्ञानेश्वरीतील १०० ओव्या वाचायची. ‘त्या वेळी त्याचा अर्थ कळला नाही, तरी ऐकत रहावे’, असे तिला वाटायचे. त्यांनी सांगितलेली षष्ठीदेवी स्तोत्र, दुर्गाकवच ही स्तोत्रेही ती आणि तिचे यजमान नियमित म्हणत.
४ अ २. गर्भसंस्कार विधी केले, त्या वेळी घरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
४ आ. सहावा मास : सौ. कांचन गरोदरपणी आस्थापनात जातांना आणि येतांना नियमित नामजप करायची.
४ इ. नववा मास : १२.५.२०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आयोजित केलेल्या ‘एकता दिंडी’च्या वेळी धर्मध्वजापाशी रांगोळी काढण्याची सेवा कांचनला मिळाली. त्यायोगे ईश्वराच्या सान्निध्यात रहायची संधी मिळाली.
४ ई. देवाच्या कृपेने बाळाचा जन्म होऊन नैसर्गिक प्रसुती होणे : आधुनिक वैद्यांनी १४.६.२०१९ ही बाळंतपणाचा दिनांक सांगितला होता. त्याच दिवशी देवाच्या कृपेने नैसर्गिक प्रसुती झाली. वैद्य वेधस कोल्हटकर यांनी नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी काही औषधे दिली होती आणि सुलभ प्रसुतीसाठी एक मंत्र म्हणायला सांगितला. त्यामुळे पुष्कळ लाभ झाला.
५. जन्मानंतर
५ अ. १ ते ३ मास
१. जन्म झाला, त्या रात्री अवनी रडत होती. तेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त’, असा नामजप केल्यानंतर लगेच ती रडायची थांबली.
२. देवाची आवड : झोपतांना तिच्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा केलेली असायची. ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘जय जय रघुवीर समर्थ’ हे जयघोष केल्यानंतर ती एक मासांची असल्यापासूनच हुंकार देऊन प्रतिसाद देते. परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवल्यावर तिने त्यावर झेपच घेतली. ती श्रीकृष्णाच्या चित्राकडेही नेहमी झेप घेते.
३. बालक दैवी आणि उच्च लोकातील असल्याचे पू. जयराम जोशीआजोबांनी सांगणे : पू. जयराम जोशीआजोबा यांना बाळाचे १ मासाचे छायाचित्र पाठवल्यावर ते पाहून म्हणाले, ‘‘बालक दैवी आणि उच्च लोकातील आहे.’’ अशा प्रकारे तिला पू. आजोबांचा आशीर्वाद मिळाला.
४. एखादी व्यक्ती बोलत असेल, तर बोलणे संपेपर्यंत ती बोलणार्याकडे स्थिर दृष्टीने पहाते.
५. १९.९.२०२० या दिवशी (पितृपक्ष चालू होता) झालेला ‘राष्ट्रीय भावसत्संग’ ती शेवटचा अर्धा घंटा शांतपणे ऐकत होती.
५ आ. ५ ते ७ मास : ७.११.२०१९ या दिवशी गुरुवारी झालेल्या भावसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी म्हटलेली प्रार्थना तिने पूर्ण ऐकली. त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावर ‘त्या बोलत असलेला प्रत्येक शब्द तिला कळत आहे’, असा भाव होता.
५ इ. ९ मास
५ इ १. परिस्थितीशी जुळवून घेणे : एप्रिल २०२० मध्ये ती ९ मासांची होती. त्या वेळी दळणवळण बंदी लागू झाल्याने घरातून बाहेर पडता येत नव्हते. तेव्हा ती खेळण्यांच्या समवेत स्वतःला रमवत होती. दळणवळण बंदी शिथिल झाल्यावर तिच्या घरी गेल्यावर तेथील जागेत आणि तिला सांभाळणार्या मावशींच्या समवेत ती लगेच समरस झाली. तिच्या घरून शनिवार-रविवार ती आमच्या घरी यायची, तेव्हा परत इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायची.
– सौ. विजया मिलिंद भिडे
५ ई. १० मास
५ ई १. देवाची ओढ
अ. मी तिला नित्यनेमाने मांडीवर घेऊन गणपति स्तोत्र, मारुति स्तोत्र आणि रामरक्षा म्हणतो. स्तोत्र पूर्ण होईपर्यंत ती लक्ष देऊन ऐकत रहाते. १० मासांची असल्यापासून ती माझ्या मांडीवर बसून देवाला गंध लावणे, फुले वहाणे अशा कृती करते.’ – श्री. मिलिंद भिडे (चि. अवनीचे आजोबा, आईचे वडील), पुणे
आ. १३ आणि १५.५.२०२० या दिवशी झालेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘ऑनलाईन’ भावसोहळा तिने शांत बसून बघितला. कार्यक्रमाच्या शेवटी लागलेले कृतज्ञतागीत ती लक्षपूर्वक ऐकत होती. सोहळा चालू असतांना तिला गुरुदेवांचे छायाचित्र दाखवले. ते पहाताच तिने लगेचच हात जोडून नमस्कार केला. नंतर ‘श्रीकृष्णाचे छायाचित्र दाखवल्यावर हातात सुदर्शनचक्र फिरते आहे’, असे बोट फिरवत दाखवत होती.
इ. तिला जेवण भरवतांना अन्नपूर्णादेवीला प्रार्थना केल्यानंतर देवघरापाशी जाऊन देवीच्या मूर्तीला नमस्कार करते.
५ उ. सर्वांची लाडकी : कांचन ज्या इमारतीत रहाते, तिथे बरीच कुटुंबे आहेत. तेथील सर्वांची अवनी लाडकी आहे. अवनी खाली खेळायला कधी येणार; म्हणून सगळे वाट बघत असतात.
६. वय १ ते २ वर्षे
६ अ. चि. अवनी मराठे हिचे बोलणे उशिरा असून अजून ती स्पष्ट बोलत नाही. ती अजून एक एक शब्द उच्चारत आहे.
(सर्वसाधारणपणे मुले ९ मासापासून एक एक शब्द बोलायला लागतात. काही जण लवकर बोलायला शिकतात, तर काही जण उशिरा बोलतात. – संकलक)
६ आ. चुकांविषयी संवेदनशील असणे : जेवतांना काही पदार्थ खाली सांडला किंवा पाणी सांडले, तर देवघरातील अन्नपूर्णादेवीसमोर जाऊन ती कान पकडून उभी रहाते. तसेच खेळतांना काही चुका झाल्यावर क्षमा मागायला सांगितले की, समर्थ रामदासस्वामींच्या समोर कान पकडून उभी रहाते.
६ इ. रात्री झोपायच्या आधी समर्थ रामदासस्वामी यांच्या छायाचित्रासमोर जाऊन त्यांना नमस्कार करून झोपते.
– सौ. विजया मिलिंद भिडे
६ ई. देवाप्रती भाव : ती एक वर्षाची असतांना प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन लावल्यावर ती ते ऐकत डोलायला लागली. आमच्या घरी ते भजन आम्ही पहिल्यांदाच लावले होते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये अथवा अन्यत्र कुठेही श्रीराम, श्रीकृष्ण यांचे चित्र किंवा परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहिले की, ती हात जोडते. – सौ. कांचन मयूर मराठे (चि. अवनीची आई), पुणे
७. चि. अवनीच्या जन्मानंतर नातेवाइकांनी दिलेले अभिप्राय
अ. ‘आधी माझे बाबा (श्री. मिलिंद भिडे) नियमित पूजा करत नसत. तिच्या जन्मानंतर त्यांच्यात पालट झाला आणि ते मनापासून अन् नियमित पूजा करू लागले.
आ. तिची आजी (माझ्या सासूबाई) म्हणतात, ‘‘परमेश्वराने तिच्यात अनेक गुण घालून तिला जन्माला घातले आहे.’’
इ. तिचे मामाआजोबा (यजमानांचे मामा) म्हणतात, ‘‘काही ताण आला, तर तिचे छायाचित्र किंवा ध्वनीचित्रफित (व्हिडिओ) बघितल्यावर ताण निघून जातो.’’
– सौ. कांचन मयूर मराठे
८. चि. अवनीचे स्वभावदोष : हट्टीपणा आणि मनाप्रमाणे न झाल्यास रडणे
प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे हे बाळ आम्हाला लाभले आहे. तिच्यावर आपली अखंड कृपादृष्टी असू देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
चि. अवनी हिच्याविषयीचे हे लिखाण आपणच आमच्याकडून करवून घेतले, यासाठी आम्ही कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’
– सौ. विजया मिलिंद भिडे, पुणे (१५.६.२०२१)
|