नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन संभाजीनगरसह १४ थांबे घेणार !
समृद्धी महामार्गासाठी असलेली ६० टक्के भूमी वापरली जाणार !
संभाजीनगर – मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम चालू झाले आहे. ही रेल्वे संभाजीनगरसह १४ थांबे घेणार आहे. समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने हा रेल्वेमार्ग असेल. समृद्धी महामार्गासाठी आधीच संपादित ६० टक्के भूमी यासाठी वापरली जाईल. उर्वरित ४० टक्के भूमी शेतकर्यांकडून अधिग्रहीत केली जाईल. या पार्श्वभूमीवर १८ ऑगस्ट या दिवशी जिल्ह्यांतील संबंधित गावांतील शेतकर्यांना बोलावून त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी संपादित भूमीला एकच भाव ठरवावा, यात दुजाभाव नको, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आस्थापनाला देशातील ८ हायस्पीड रेल कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) सिद्ध करण्याचे काम दिले आहे. त्यापैकी अहमदाबाद-मुंबई या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात चालू असून नागपूर-मुंबईसह इतर प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करण्याचे काम चालू आहे, अशी माहिती या आस्थापनाचे संयुक्त व्यवस्थापक अनिल शर्मा यांनी दिली.