अमेरिकेत असलेली अफगानिस्तानची संपत्ती अमेरिकेने गोठवली

तालिबानला १० अब्ज डॉलर्सला मुकावे लागणार !

अफगानिस्तान सरकारची संपत्ती बाईडन सरकारने गोठवली

वाशिंग्टन/लंडन – तालिबान अफगानिस्तान कह्यात घेण्यात यशस्वी झाला असेल; परंतु त्याला देश चालवण्यासाठी लागणार्‍या अर्थसाहाय्यासाठी अडचणींशी सामना करावा लागणार आहे. वाशिंग्टन पोस्टप्रमाणे अमेरिकी बँकांमध्ये असलेली अफगानिस्तान सरकारची संपत्ती बाईडन सरकारने गोठवली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या बँकांमध्ये असलेली अफगानिस्तानची १० अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती तालिबानला प्राप्त करता येणार नाही.

१. रायटर्स या वृत्तसंस्थेने सांगितल्याप्रमाणे अफगानिस्तानची बहुतांश संपत्ती देशाबाहेर ठेवण्यात आली असून तेथपर्यंत पोहचणे तालिबान्यांना कठीण आहे. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष प्रमाणे एप्रिलपर्यंत अफगानिस्तानच्या केंद्रीय बँकेजवळ ९.४ अब्ज डॉलर्स आरक्षित संपत्ती होती; परंतु संपत्तीचा एक मोठा भाग अफगानिस्तानच्या बाहेर आहे.

२. व्हाईट हाऊस आणि ट्रेझरी विभागाच्या प्रवक्त्याने अफगानिस्तानची संपत्ती गोठवण्याच्या प्रक्रियेविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बहुतेक विकसनशील देशांच्या केंद्रीय बँका त्यांची संपत्ती फेडरल रिझर्व बँक ऑफ न्यूयॉर्क किंवा बँक ऑफ इंग्लंड यांसारख्या संस्थांकडे ठेवतात.

३. अफगानिस्तान जगातील सर्वाधिक गरीब देश असून अमेरिकेच्या साहाय्यावर अवलंबून आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलियन म्हणाले की, अमेरिकेचे प्रशासन तालिबानशी थेट संवाद साधणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बाइडन यांनी ‘अफगानिस्तानला साहाय्य चालू राहील’, असे नुकतेच म्हटले आहे. अफगानिस्तानला मिळणार्‍या आंतरराष्ट्रीय साहाय्याविषयी २३ ऑगस्ट या दिवशी १९० देशांच्या सदस्यांची एक बैठक आहे. त्यामध्ये अफगानिस्तानचे ६५० बिलियन डॉलर्सचे प्रलंबित साहाय्य द्यायचे की नाही, हे ठरणार आहे.

४. युनेस्कोने सांगितल्याप्रमाणे अफगान केंद्रीय बँकेच्या तिजोरीमध्ये २ सहस्र वर्षे जुने सोन्याचे अलंकार आणि नाणी आहेत, तसेच अनुमाने २१ सहस्र प्राचीन कलाकृती केंद्रीय बँकेच्या तहखान्यामध्ये मिळाली होती. टोलो न्यूजप्रमाणे अफगाण नेत्यांनी चोरीच्या भितीने त्यांची संपत्ती देशाबाहेर ठेवण्याचा विचार केला होता.