छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेले सन्मानपत्र !
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत ! या दैवताची मूर्ती हिंदूंच्या मनात उभी करून तिचे पूजन करायला लावणारे अवलिया, शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार अन् या वयातही तसूभर न थकता शिवछत्रपतींचा महिमा गात मंत्रमुग्ध करणारे शिवशाहीर ! छत्रपती शिवरायांचा इतिहास हिंदु समाजाच्या हृदयावर ठासवण्याचे आणि शिवरायांची कीर्ती दिगंत करण्याचे आजवर कुणी केले नसेल, असे महान कार्य आपल्या हातून आई तुळजाभवानीने करवून घेतले. त्यासाठी श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी कृतज्ञता आणि आई भवानीने आपल्यावर कृपा करावी, असे विलक्षण कार्य आपण केले, त्यासाठी आपल्या चरणीही कृतज्ञता !
१. मोगलांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत हिंदूंच्या वंशविच्छेदाचा प्रयत्न केला. इंग्रजांनी हिंदूंना मानसिक गुलाम बनवून संपवण्याचा प्रयत्न केला; पण याही स्थितीत हिंदूंनी आपण वर्णिलेला पराक्रमी इतिहास वाचून त्यातून प्रेरणा घेतली. आज पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्रा’च्या म्हणजे छत्रपतींच्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेच्या दिशेने होत असलेली देशाची वाटचाल पहाता हिंदु मनात ‘शिवछत्रपती’ जागवण्याच्या आपल्या महत्कार्याचा यामध्ये खारीचा नव्हे, तर मोलाचा वाटा आहे !
२. आपल्या सात्त्विक, सुमधूर वाणीतून; पण तितक्याच क्षात्रभावाने ओतप्रोत भरलेले शिवचरित्र कितीही वेळा ऐकले, तरी ते ऐकतच रहावेसे वाटते. युवकांना छत्रपती शिवरायांचे वेड लावायचे असेल, तर शिवचरित्र वाचायला द्यावे, असे ते आहे. हिंदु जनजागृती समिती आपल्या अद्वितीय कार्याचा गौरव करते; ‘शिवचरित्रातून हिंदु युवा पिढीला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रेरणा मिळावी’, अशी प्रार्थनाही करते. हिंदु जनजागृती समिती ईश्वरी कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदूसंघटन यांद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध आहे. या कार्याला आपलाही आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना !’
– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती