खाऊच्या (प्रसादाच्या) माध्यमातून सर्वांना चैतन्य देणारे आणि सतत इतरांच्या आनंदाचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. आठवले

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमात केलेली ‘प्रसाद भांडार’ची निर्मिती’, सतत साधकांचा विचार करणारी गुरुमाऊली आदी सूत्रे पाहिली. आज आपण या लेखाचा अंतिम भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/503828.html

५. प्रसादरूपी खाऊच्या संदर्भात साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरु डॉक्टरांची अपार प्रीती !

५ अ. साधिकेने प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांचा जाण्याचा मार्ग झाडून ठेवणे आणि याविषयी कुणालाही काही ठाऊक नसतांना गुरुमाऊलीने साधिकेला खाऊ देणे : रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर प्रतिदिन सकाळी बांधकाम बघायला येत असत. त्या वेळी ते मी सेवा करत असलेल्या ध्वनीचित्रीकरण कक्षाच्या बाजूच्या मार्गिकेमधून (पॅसेजमधून) जात असत. ते येण्यापूर्वी मी प्रतिदिन ती मार्गिका झाडून ठेवत असे; पण याविषयी कुणाला काहीच ठाऊक नव्हते. असे मी जवळजवळ १ मास झाडल्यावर एक दिवस परात्पर गुरुदेव जाता जाता कक्षात आले आणि त्यांनी मला खाऊ दिला. तेव्हा ते काहीही बोलले नाहीत; पण त्यांनी ‘मला खाऊ का दिला ?’, हे केवळ मला आणि त्यांनाच ठाऊक होते.

सौ. मंगला मराठे

५ आ. साधिका तिचा खाऊ सहसाधकांना ‘प्रसाद’ म्हणून देत असल्याचे कळल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी तिला तो खाण्यास सांगणे आणि साधकांना वेगळा खाऊ देणे : सेवेनिमित्त मी परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यावर ते मला वेळोवेळी खाऊ देत. मी तो खाऊ सर्वांना ‘प्रसाद’ म्हणून कण कण वाटत असे. हे परात्पर गुरु डॉक्टरांना कळल्यावर त्यांनी मला एकदा खाऊ देतांना म्हटले, ‘‘हातात दिलेला खाऊ आधी इथेच खा. अन्य साधकांना वाटायला मी दुसरा देतो’’, असे म्हणून त्यांनी दुप्पट खाऊ देण्यास चालू केले.

५ इ. खाऊ देतांना एक ‘यू’ पिनही देणे आणि ‘खाऊ मऊ पडू नये’, यासाठी ती पाकिटाला लावण्यास सांगणे : एकदा मी दोन तीन दिवसांसाठी बाहेर जाणार होते; तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला खाऊ दिला. समवेत एक ‘यू’ पिन दिली आणि म्हणाले, ‘‘पाकीट फोडल्यावर खाऊ मऊ होईल. तिथे पिन कुठे शोधणार ? म्हणून ही पिनही ठेवा.’’ केवळ ईश्वरच एवढा पुढचा विचार करू शकतो.

५ ई. विदेशातून येणार्‍या साधिकेच्या बहिणीचा विचार करून तिच्यासाठी साधिकेसमवेत मिठाई, सुका मेवा आदी खाऊ देणे : एकदा मी आश्रमात काही तातडीच्या सेवांमध्ये व्यस्त होते. त्याच कालावधीत माझी बहीण विदेशातून मला भेटायला येणार होती. तिचा परात्पर गुरु डॉक्टरांशी काही परिचय नव्हता आणि ती साधनाही करत नव्हती. असे असतांनाही मी व्यस्त असल्याने तिच्यासाठी काही बनवू शकणार नाही; म्हणून त्यांनी मला दोन तीन प्रकारच्या उंची मिठाया, सुका मेवा इत्यादी दिले.

५ उ. बरेच दिवसांनी घरी जाणार्‍या साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांनी मोठा केक देऊन तो अन्य साधकांना देण्यास सांगून ‘साधक-कुटुंब’ ही संकल्पना बिंबवणे : एकदा आश्रमात यज्ञानिमित्त अनेक तातडीच्या सेवा चालू होत्या. त्यामुळे मी फोंडा आश्रमातून घरी जाऊ शकले नव्हते. सेवा पूर्ण झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला घरी जाऊन मुलांना भेटून येण्यास सांगितले. त्या वेळी त्यांनी माझ्या हातात अक्रोड, बदाम इत्यादी घातलेला एक भलामोठा केक दिला. मी म्हटले, ‘‘एवढा मोठा केक नको. मी केक कापून त्याचे तुकडे नेते.’’ यावर ते म्हणाले, ‘‘तेथे अन्य साधकही आहेत ना !’’ ‘साधक-कुटुंब’ ही संकल्पना बिंबवण्यासाठी त्यांनी कृतीतून हे मला शिकवले.

५ ऊ. एका साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांसाठी दिलेले आंबे त्यांनी आश्रमातून बाहेरगावी चाललेल्या दोन साधकांना हंगामात खाण्यास मिळणार नसल्याने देणे : फेब्रुवारी मासाचे अखेरचे दिवस होते. परात्पर गुरु डॉक्टरांसाठी एका साधकाने त्याच्या घरचे वैशिष्ट्यपूर्ण आणि लवकर पिकलेले ६ आंबे दिले होते. त्याच वेळी माझे यजमान आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे ‘कोलकाता ते मुंबई’ अशा धर्मप्रसार दौर्‍यावर जाण्यासाठी निघणार होते. एक विदेशातील साधिकाही घरी जाणार होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला बोलावून यजमानांना आणि त्या विदेशात जाणार्‍या साधिकेला ‘आंब्याच्या हंगामात आंबे खायला मिळणार नाहीत’; म्हणून एक एक आंबा देण्यास सांगितले. साधकांचा एवढा विचार केवळ गुरुमाऊलीच करू शकते.

५ ए. साधकांच्या घरी जातांना त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जाण्याची आठवण करून देणारी गुरुमाऊली ! : धर्मप्रसार सेवेनिमित्त मी गोव्यातील विविध ठिकाणच्या साधकांच्या घरी वास्तव्याला जायचे. निघतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगायला जायचे. तेव्हा ते मला नेहमी गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारचे खाऊ द्यायचे. ‘तुम्ही ज्यांच्याकडे रहाणार, त्यांना देण्यास खाऊ घेतला आहे ना !’, याचेही ते स्मरण करून द्यायचे. यातून त्यांची साधकांवरील अपार प्रीती शिकायला मिळायची.

५ ऐ. मुलीची परीक्षा असतांना गुरुदेवांनी तिला भेटून येण्यास सांगून तिच्यासाठी खाऊ देणे आणि त्यामुळे मुलीचा ‘गुरुदेव सतत आपल्या समवेत आहेत’, हा विश्वास वाढणे : माझी कन्या कु. अपर्णाची (आताच्या वैद्या (सौ.) अपर्णा नाईक) दहावीची परीक्षा होती. मी फोंडा आश्रमात एका यज्ञाच्या संदर्भातील तातडीची सेवा करत होते. त्यामुळे मला घरी जायला मिळाले नाही. परीक्षेच्या एक दिवस आधी गुरुदेवांनी मला कु. अपर्णाला भेटून येण्यास सांगितले. जातांना त्यांनी मला तिच्यासाठी खाऊ म्हणून एक मोठे कॅडबरी-चॉकलेट दिले. काही वेळाने त्यांनी ८ चॉकलेट असलेले एक पाकीटही दिले आणि म्हणाले, ‘‘हेही तिला द्या आणि सांगा, ‘आठ दिवस आठ चॉकलेट खा.’’ यामुळे अपर्णाचा ‘आई-वडील जवळ नसले, तरी गुरुदेव सतत आपल्या समवेत आहेत’, हा विश्वास वाढला आणि माझ्या मानसिक आधारापेक्षा गुरुकृपेवरील तिची श्रद्धा वाढली.

५ ओ. साधिकेने खराब झालेला खाऊ ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण केल्याचे कळल्यावर गुरुदेवांनी भाव आणि साधना यांविषयी सांगणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला खाऊ दिला. तो खाऊ जरा खराब झाला होता; पण मी तो ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण केला. दुसर्‍या दिवशी गुरुदेवांनी त्या खाऊतील एक तुकडा खाल्ला आणि तो खराब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला बोलावून ‘खाऊ खाल्ला का ?’, असे विचारले. मी ‘हो’ म्हटल्यावर ते म्हणाले, ‘‘खाऊ कसा होता ?’’ मी चाचरत सांगितले की, तो खराब झाला होता. मग ते म्हणाले, ‘‘मग खाऊचे काय केलेत ?’’ मी म्हटले, ‘‘तो प्रसाद होता ना ?; म्हणून मी खाल्ला.’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘प्रसाद’ म्हणून भाव आहे’, हे चांगले आहे’’; पण भाव डोळस असायला हवा. खराब झालेला खाऊ खाऊन पोट बिघडले, तर ते पूर्ववत् होण्यासाठी आपली साधना वाया जाणार.’’

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२१)                                                            (समाप्त)