गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्याची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून पहाणी
कणकवली – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्याला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भेट देऊन पहाणी केली. या वेळी त्यांनी गणेशोत्सवापूर्वी येथे आवश्यक असलेल्या सोयीसुविधा निर्माण करण्याचे आणि मोठ्या संख्येने प्रवासी आल्यास असुविधा होऊ नये, यांसाठी नियोजन करण्याचे संबंधितांना निर्देश दिले.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा सण ! यासाठी नोकरी, व्यवसाय यांनिमित्त जिल्ह्याच्या बाहेर असणारे सिंधुदुर्गवासीय प्रतिवर्षी रेल्वे, राज्य परिवहन मंडळाची बस (एस्.टी.), खासगी आरामबस, खासगी वाहने यांतून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येतात. कोरोनामुळे निर्बंध आल्याने गेल्या वर्षी सिंधुदुर्गात येणार्या गणेशभक्तांचे प्रमाण अल्प होते; मात्र या वर्षी सध्यातरी कोरोनाचा संसर्ग उणावल्याचे दिसत असल्याने गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.