‘शेर-ए-पंजाब’ पुन्हा व्हावेत !
संपादकीय
‘शेर-ए-पंजाब’ म्हणून ओळखले जाणारे महाराजा रणजित सिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पाकमधील लाहोर येथे तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने हे कृत्य केले. महाराजांचा पुतळा तोडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २ वेळा त्यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. महाराजा रणजित सिंह हे शीख साम्राज्याचे जनक होते. अफगाणिस्तानमधील काबुलचा काही भाग; पाकमधील पेशावर, मुलतान, लाहोर, तसेच तिबेटपर्यंत त्यांचे साम्राज्य विस्तारले होते. त्या काळात आताच्या पाकमधील बराचसा भाग हा शीख साम्राज्याच्या अधीन होता. ‘एका ‘काफीर’ शिखाने आमच्या पूर्वजांवर राज्य केले’, ही गोष्ट पाकमधील जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांच्या पचनी कशी पडणार ? त्यामुळे शिखांचा समृद्ध इतिहास मिटवण्याचा प्रकार तेथे चालू आहे. या कुकृत्याला भारतातून विरोध झाला; मात्र तो वरवरचा होता. भारतात हिंदूंवर राज्य करणारे हुमायू, बाबर, अकबर या क्रूर धर्मांध आक्रमकांना ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून रंगवण्यात मग्न असणारे भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर मात्र गप्प आहेत. वर्ष १७९९ मध्ये म्हणजे साधारण २२२ वर्षांपूर्वी महाराजा रणजित सिंह यांनी लाहोर कह्यात घेतले. या घटनेकडे शिखांचा सोनेरी इतिहास म्हणून पाहिले जाते. आज लाहोर पाकमध्ये आहे. तेथील शीखच नव्हे, तर हिंदू नरकयातना भोगत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या पराक्रमाने धर्मांध आक्रमकांना पाणी पाजणार्या महाराजा रणजित सिंह यांच्यासारख्या ‘शेर-ए-पंजाब’ची आज भारताला नितांत आवश्यकता आहे !
अफगाण्यांना धूळ चालणारे महाराजा !
अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा वर्चस्व मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर महाराजांनी अफगाण्यांच्या विरोधात गाजवलेल्या पराक्रमाची येथे चर्चा व्हायला हवी. महाराजा रणजित सिंह हे वयाच्या १०व्या वर्षी पहिली लढाई लढले. अफगाणिस्तानचा राजा झमनशाह दुर्रानी हा भारतावर चाल करून आला. त्या वेळी महाराजांनी त्याच्याशी दोन हात केले आणि त्याला पळवून लावले. त्या वेळी महाराजा रणजित सिंह केवळ १७ वर्षांचे होते. त्यानंतर महाराजांचा दुर्रानीशी ३ वेळा सामना झाला. या तिन्ही वेळा महाराजांनी त्याला सळो कि पळो करून सोडले. अफगणिस्तानी धर्मांध आक्रमकांच्या विरोधात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमांमुळेच त्यांना ‘शेर-ए-पंजाब’ ही उपाधी देण्यात आली.
तालिबान्यांनी अफगाणिस्तान कह्यात घेणे आणि त्याच काळात लाहोरमध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड होणे, या घटनाही एकमेकांशी निगडित आहेत. शिखांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा सर्वाधिक प्रयत्न अफगाणी आक्रमकांनी केला आणि तो महाराजांनी हाणून पाडला. एवढेच नव्हे, तर महाराजांचे सेनापती हरिसिंह नलवा यांनी खायबर खिंडीच्या परिसरात असलेल्या जमरूड येथे किल्ला बांधला. अफगाणी आक्रमकांनी भारतात घुसखोरी करू नये आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. आज त्याच अफगाणी आक्रमकांचे वंशज असलेले तालिबानी भारताला डोळे वटारून दाखवत आहेत. अशा स्थितीत महाराजा रणजित सिंह यांचा विस्मृतीत गेलेला इतिहास पुन्हा जागृत करण्याची आणि त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. भारताचे इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न अफगाणी, तुर्की आदी विविध आक्रमकांनी पाहिले; मात्र महाराजा रणजित सिंह यांच्यासारख्या अनेक थोर भारतीय योद्ध्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. धर्मांधांना हीच गोष्ट खुपते. त्याचा राग महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करून व्यक्त केला जातो.
खलिस्तानी झोपले आहेत !
खलिस्तानवाद्यांना स्वतंत्र खलिस्तान हवा असून त्यांना पंजाबचा लचका तोडायचा आहे. यासाठी ते अमेरिका, कॅनडा आदी देशांत राहून भारतातील शिखांना भडकावत आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांनी पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी हातमिळवणी केली आहे. भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी विदेशात कार्यरत असलेले खलिस्तानवादी अर्थपुरवठा करत आहेत. हे खलिस्तानवादी पाकमध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर मात्र गप्प आहेत. अमृतसरमधील ‘सुवर्ण मंदिर’ हे शिखांचे मानचिन्ह आहे. महाराजा रणजित सिंह यांनी या मंदिराला सोन्याने मढवले. त्यामुळे शिखांमध्ये महाराजा रणजित सिंह यांना मानाचे स्थान आहे. अशा महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड खलिस्तानवाद्यांना चालते का ? महत्त्वाचे म्हणजे लाहोर ही शीख साम्राज्याची राजधानी होती. गुरु गोविंदसिंह यांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी बांधण्यात आलेला गुरुद्वाराही पाकमध्ये आहे. ‘स्वतंत्र खलिस्तान हे पंजाबपुरतेच मर्यादित रहाणार का ?’ किंवा ‘पाकमधील शिखांची ही महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे परत मिळवण्यासाठी खलिस्तानवादी प्रयत्न करणार का ?’ या प्रश्नांची उत्तरे खलिस्तानवादी देत नाहीत, हे लक्षात घ्या !
शीख हा ‘विरांचा समाज’ म्हणून ओळखला जातो. अनेक शीख योद्ध्यांनी मुसलमान आक्रमकांच्या विरोधात सैन्य उभारले. अनेकांनी या आक्रमकांचे अत्याचार सहन केले; मात्र धर्मांतर केले नाही आणि हसतहसत प्राणार्पण केले. महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड करून धर्मांधांनी शीख समाजाच्या अस्मितेला हात घातला आहे. ही केवळ पुतळ्याची तोडफोड नव्हे, तर धर्मांधांसाठी वर्चस्वाची लढाई आहे. हा अवमान शीख समाज आणि त्याहून अधिक खलिस्तानवादी खपवून घेणार का ? स्वतंत्र खलिस्तानसाठी हिंदूंशी वैरभावनेने वागणार्या खलिस्तानवाद्यांनी त्यांच्यावर अन्याय करणार्या धर्मांधांचा प्रथम समाचार घ्यावा. त्यांनी असे केले नाही, तर ‘धर्मांधांचे गुलाम’ म्हणून इतिहासात त्यांची नोंद होईल !