इतिहास-संशोधनाच्या क्षेत्रात अफाट कार्य करूनही नम्रतेने अन् प्रेमाने सर्वांना आपलेसे करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय ९९ वर्षे) !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६.८.२०२१ या दिवशी पुणे येथे त्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी तेथे उपस्थित असणार्या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी गेल्यावर तेथे सहजता आणि साधेपणा अनुभवायला मिळणे
‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायला जाण्याआधी त्यांच्या उत्तुंग कार्याविषयी ठाऊक असल्याने ‘त्यांचे व्यक्तीमत्त्व पुष्कळ मोठे आहे. ही भेट कशी असेल ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. प्रत्यक्षात त्यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या खोलीतही अत्यंत सहजता आणि साधेपणा अनुभवायला मिळाला. तेथील वातावरणात कोणतेही दडपण जाणवत नव्हते.
२. त्यांच्या खोलीत गेल्यावर आमची त्यांच्याशी आधीची ओळख नसतांनाही त्यांनी स्वतःहून आम्हाला अत्यंत आपुलकीने हात जोडून आनंदाने नमस्कार केला.
३. त्यांनी उपस्थित सर्वांची आस्थेने विचारपूस केली आणि तितक्याच प्रेमाने ते सर्वांचे बोलणे ऐकून त्यांना प्रतिसादही देत होते.
४. नम्रता
आदरणीय बाबासाहेब यांचे इतिहास-संशोधनाच्या क्षेत्रातील कार्य अफाट आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या मंत्राने भारलेले आयुष्य ते जगले आहेत. इतिहासाच्या अभ्यासातून त्यांना मिळालेले ज्ञान देशप्रेमाच्या उत्कटतेतून त्यांनी विश्वभरात पोचवले आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मान यांनी गौरवांकित झालेले हे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे नम्र आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे ज्ञान यांचे मोठेपण डोकावत नाही.
५. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाकून नमस्कार करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे
अ. त्यांना नमस्कार करतांना मी त्यांच्या पायांवर झुकले. त्या वेळी ‘लोकांमध्ये इतिहासाविषयी जागृती करण्यासाठी या पायांनी किती कष्ट घेतले आहेत !’, या विचारांनी माझा भाव जागृत झाला.
आ. त्यांच्या पायांची त्वचा गुलाबी रंगाची आहे.
इ. सर्वसाधारण वयोवृद्ध व्यक्तीच्या त्वचेला पुष्कळ सुरकुत्या पडलेल्या असतात; परंतु बाबासाहेबांच्या पायांच्या त्वचेला मात्र अल्प सुरकुत्या आहेत.
६. वयाच्या ९९ व्या वर्षी आनंदी, उत्साही आणि सुहास्यवदन असणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !
आदरणीय बाबासाहेबांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ आनंद आणि चैतन्य जाणवले. ‘९९ वर्षांची वृद्ध व्यक्ती इतकी उत्साही आणि सुहास्यवदन असू शकते’, हे मला दैवी वाटले. वयोमानामुळे त्यांना ऐकू येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. ही मर्यादा सोडली, तर अन्य कोणत्याच बाजूने ते ९९ वर्षांचे वाटणार नाहीत. ‘त्यांची लोकांना भेटण्याची आणि बोलण्याची ऊर्जा, उत्साह अन् जिज्ञासा तरुणांनाही अचंबित करेल’, अशी आहे.
७. ते आमच्या समवेत असूनही सगळ्यांपासून अलिप्त आहेत, तरी ‘वर्तमानातील प्रत्येक क्षणी आनंद घेऊन ते आम्हाला आनंद देत आहेत’, असे मला वाटले.
८. स्वतःच्या कार्याचा बडेजाव न करता निरपेक्षतेने साधे आयुष्य जगणे
आदरणीय बाबासाहेबांकडे जाण्याचे निश्चित झाले, त्या वेळी आणि नंतरही माझ्या मनात ‘निष्काम कर्मयोगी’ हे शब्द सतत येत राहिले. माझ्या अल्प बुद्धीला ‘त्यांनी दिलेली व्याख्याने, लेखन आणि ‘जाणता राजा’ या जिवंत महानाट्याचे भव्य-दिव्य प्रयोग’, यांपलीकडे त्यांच्या कार्याची अधिक माहिती नव्हती. वृत्तसंकलनाची सेवा करतांना मला त्यांच्याविषयीचे काही लेख मिळाले. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, त्यांचे कार्य किती अफाट आहे ! त्यांना वेळोवेळी मिळालेले मानधन त्यांनी जनहितार्थ वाटून टाकले आहे. ही रक्कम कोट्यवधींच्या घरातही असेल; परंतु कसलाही गाजावाजा न करता, त्याचा बडेजाव न करता आणि समाजाकडून कसलीही अपेक्षा न करता ते साधे आयुष्य जगत आहेत.
९. ‘त्यांना भेटायला येणार्या प्रत्येकाविषयी त्यांना कृतज्ञता वाटते’, असे त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आले.
१०. अनुभूती
बाबासाहेबांना अर्पण केलेला हार त्यांनी काढून ठेवल्यानंतर हाराच्या स्पंदनांमध्ये चांगला पालट झाल्याचे जाणवणे : त्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर काही वेळाने त्यांनी तो काढला आणि त्यांच्या मागे एके ठिकाणी ठेवला. त्या वेळी ‘बाबासाहेबांनी तो हार घातल्यामुळे त्या हाराच्या स्पंदनांमध्ये चांगला पालट झाला आहे’, असे मला जाणवले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आदरणीय बाबासाहेबांचे उत्तुंग व्यक्तीमत्त्व काही क्षण जवळून पहाण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली’, यासाठी आम्ही सर्व जण त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमन करतो. ‘इतिहासप्रेमी, देशभक्त, संशोधक, अभ्यासक, लेखक, संघटक, संयोजक, दिग्दर्शक, अभिनेता, गिर्यारोहक, कुशल वक्ता’, अशा अंगभूत गुणांचे भांडार असणार्या; व्रतस्थ आणि ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांचा संगम असलेल्या कर्मयोगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (१६.८.२०२१)
सन्मानाच्या वेळी बाबासाहेब पुरंदरे यांचा अनुभवलेला कृतज्ञताभाव !
१. ‘सन्मानाच्या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ग्रंथ, सनातनची सात्त्विक उत्पादने आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. या चैतन्यमय भेटीप्रतीचा कृतज्ञताभाव त्यांच्या कृतीतून आणि तोंडवळ्यावर जाणवत होता. त्यांनी आनंदाने आणि कृतज्ञताभावाने सन्मानाचा स्वीकार केला.
२. सन्मानात मिळालेल्या सर्व वस्तू ते भावपूर्ण हाताळत होते.
३. त्यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी लिहिलेले सन्मानपत्र देण्यात आले. त्यात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी त्यांचे आशीर्वाद मागण्यात आले आहेत. ते सन्मानपत्र हातांत घेतल्यावर ‘ते कधी एकदा वाचतो ?’, असे त्यांना झाले होते’, असे मला जाणवले. भेटायला आलेल्या अन्यांच्या समवेत छायाचित्र काढतांना, तसेच त्यांच्याशी बोलतांनाही बाबासाहेब ते सन्मानपत्र मधे मधे वाचत होते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीची संधी मिळाली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – श्री. कृष्णाजी पाटील (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१६.८.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक