ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३२१ वी जयंती साजरी !
‘इतिहास पेशवाईचा’ या शैलेश जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, १८ ऑगस्ट – ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात १८ ऑगस्ट या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३२१ वी जयंती साजरी करण्यात आली. ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रतिवर्षी शिवजयंती, शिवराज्याभिषेकदिन, ‘देहली विजय दिवस’ साजरे करण्यात येतात. या वर्षीपासून श्रीमंत बाजीराव पेशवे जयंतीसुद्धा अशीच भव्यपणे साजरी करण्यात येईल, असे महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी सांगितले.
पुण्यात लाल महाल ते शनिवारवाडा अशी मिरवणूक ब्राह्मण महासंघाच्या वतीने काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोड्यावर बसलेल्या बाल कलाकारांसह, पारंपरिक आणि पेशवेकालीन वेशभूषेत अनेकजण सहभागी झाले होते. शनिवारवाडा येथे अभिवादन करून त्याच मैदानावर ‘इतिहास पेशवाईचा’ या शैलेश जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन इतिहासकार मोहनजी शेटे, कुंदन साठे, श्री गानू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.