गोवा शासन ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्रारंभ करण्याच्या सिद्धतेत
पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा शासन मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करून ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्रारंभ करण्याच्या सिद्धतेत आहे; मात्र ‘चार्टर्ड (खासगी छोटी) विमाने’ चालू करण्यासाठी केंद्रशासनाने अनुमती देणे आवश्यक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम् असोसिएशन ऑफ गोवा’ (‘टीटीएजी’) या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलत होते.
प्रारंभी ‘टीटीएजी’ने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ऑक्टोबरपासून गोव्यात ‘चार्टर्ड विमाने’ चालू करण्याची मागणी केली. ‘टीटीएजी’च्या मागणीविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यात ‘चार्टर्ड विमाने’ चालू करण्याची मागणी केंद्रीय गृह मंत्रालय आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांच्याकडे करण्यात येणार आहे. राज्यात पर्यटन व्यवसाय चालू करण्यासाठी गोवा शासन सकारात्मक आहे; मात्र अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कोरोना महामारीविषयी राज्यातील स्थितीचा आढावा पुढील २ मासांत घेऊन मगच यावर निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास शासन देणार असलेल्या सर्व अनुमती रहित केल्या जाणार आहेत.’’