स्वातंत्र्य आले; पण सुराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
बेंगळुरू (कर्नाटक) – भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण हिंदूंची मंदिरे सरकारपासून मुक्त झालेली नाहीत, हिंदु मुलांना शाळेत महाभारत, रामायण आणि भगवद्गीता शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिले जात नाही. देशात लोकशाहीच्या नावाखाली भ्रष्टाचार, लूट आणि शोषण चालू आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’, असे सांगून ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढले. अनेक क्रांतीकारकांनी स्वराज्यासाठी बलीदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही स्वातंत्र्यासह हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. या सर्वांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण त्याही पुढे जाऊन सुराज्य (हिंदु राष्ट्र) साकार करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, तरच आपण पुढच्या पिढीला आनंद देऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी केले. बेंगळुरू येथील श्री महागणपतिनगर येथे ‘वन्दे मातरम् समाज सेवा समिती’च्या वतीने १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मोहन गौडा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वन्दे मातरम् समाज सेवा समितीचे श्री. रवि यांनी केले. या कार्यक्रमाला वन्दे मातरम् समाज सेवा समितीचे सदस्य आणि महिला उपस्थित होत्या.
या प्रसंगी वन्दे मातरम् समाज सेवा समितीचे श्री. नटराज बी. म्हणाले, ‘‘देशात इस्लामिक आतंकवाद, लव्ह जिहादच्या घटना पुष्कळ घडत आहेत. यावर आपण नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’ तसेच देशातील हिंदूंची लोकसंख्या न्यून होत असल्याविषयी श्री. नटराज बी. यांनी चिंता व्यक्त केली.