गोव्यात महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास शासनाची अनुमती

पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास असलेले निर्बंध शासनाने उठवल्याने महाविद्यालये आता प्रत्यक्ष वर्ग चालू करू शकणार आहेत.

उच्च शिक्षण संचालनालयाने १७ ऑगस्ट या दिवशी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शिक्षण संस्थांच्या प्रमुखांनी चालू शैक्षणिक वर्षात (वर्ष २०२१-२२) वस्तूस्थितीचा अभ्यास करून आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धेनुसार महाविद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासंबंधी निर्णय घ्यायचा आहे. या वेळी कोरोना महामारीशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. महाविद्यालयाच्या ज्या कर्मचार्‍यांनी कोरोनाबाधित झाल्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांना प्रत्येक आठवड्याला ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल महाविद्यालयाला द्यावा लागणार आहे.

शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये यांचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासंबंधी अजूनही निर्णय नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा शासनाने शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये यांचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासंबंधी अजूनही निर्णय घेतलेला नाही. महाविद्यालयाचा विद्यार्थीवर्ग १८ वर्षांहून अधिक वयोगटातील असल्याने आणि त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने महाविद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.