इतरांचा विचार करणार्या आणि तळमळीने सेवा करणार्या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नंदा नारायण माने (वय ६६ वर्षे) !
‘अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सौ. नंदा नारायण माने ‘प्रसारसेवा करणे, प्रवचन करणे, जिज्ञासूंना संपर्क करणे’ इत्यादी सेवा करतात. सहसाधिकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर
१. सेवेची तळमळ
‘सौ. मानेकाकूंचे वय ६६ वर्षे असूनही त्या सेवा करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही काकू अकलूज येथून आल्या होत्या. (सोलापूर ते अकलूज हे अंतर साधारणतः अडीच घंट्यांचे आहे.) पुष्कळ ऊन असूनही काकू घरोघरी सभेच्या प्रसारासाठी जायच्या.
२. कृतज्ञताभाव
‘मला गुरुदेवांच्या कृपेने सेवेला यायला मिळाले. तेच माझ्याकडून सेवा करवून घेतात’, असा त्यांचा कृतज्ञतेचा भाव असतो.
३. ‘काकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, असे मला जाणवते.’ (२७.४.२०२१)
सौ. हर्षदा नामदेव जाधव, अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर)
१. प्रेमभाव
‘काकूंनी घरी काही खाऊ बनवला, तर त्या साधक आणि त्यांची मुले यांच्यासाठी तो घेऊन येतात. त्यांना भ्रमणभाष केल्यावर त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात. कुणी आजारी असेल, तर त्यांची विचारपूस करून काकू त्यांना आधार देतात.
२. साधकांनी सेवा चांगली केली, तर त्या साधकांचे लगेच प्रत्यक्ष किंवा स्वतः भ्रमणभाष करून कौतुक करतात.
३. इतरांचा विचार करणे
काकू घरातील सर्व कामे करून सेवा आणि सत्संग यांसाठी येतात. त्यांच्या यजमानांना संध्याकाळी पाच वाजता चहा हवा असतो. त्यामुळे काकू त्या वेळेत घरी जातात.
४. साधनेची तळमळ
दळणवळण बंदी घोषित होण्यापूर्वी काकू वयाचा विचार न करता ऊन असतांनाही स्वभावदोष-निर्मूलन सत्संग आणि भाववृद्धी सत्संग यांसाठी यायच्या.
५. त्या सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.’ (२७.४.२०२१)