तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

अफगाणिस्तान येथील रतननाथ मंदिराच्या पुजार्‍याचा काबुल सोडून जाण्यास नकार !

  • यातून हिंदु पुजार्‍याचा उच्च कोटीचा धर्माभिमान लक्षात येतो ! ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ हे ईश्वराचे वचन आहे. त्यावर दृढ श्रद्धा असणारी व्यक्तीच अशा प्रकारे कृती करू शकते ! – संपादक

  • आपद्धर्म म्हणून एखादे संकट आल्यास स्वतःचे स्थान सोडण्याची अनुमती धर्मशास्त्रात आहे, हेही हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! – संपादक

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काबुलमध्ये असणार्‍या रतननाथ मंदिराचे पुजारी पंडित राजेश कुमार यांनी जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तानमधून पलायन करण्यास नकार दिला आहे.

पंडित राजेश कुमार म्हणाले, ‘‘काही हिंदूंनी मला आग्रह केला की, मी अफगाणिस्तान सोडावे. ‘माझ्या प्रवासाचा आणि रहाण्याची व्यवस्था करू’, असेही मला सांगण्यात आले; मात्र माझे पूर्वज शेकडो वर्षांपासून या मंदिराची सेवा करत आले आहेत. त्यामुळे मी हे मंदिर सोडणार नाही. तालिबान्यांनी मला ठार केले तरी चालेल, पण मी देव आणि मंदिर यांना सोडणार नाही ! ती माझी सेवाच ठरेल.’’