आरक्षणाच्या सूत्रावर शरद पवार जेथे सभा घेतील तिथेच सभा घेऊन त्यांना उघडे पाडू ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापूर,१७ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर जे भाष्य केले आहे, ते म्हणजे खोटे बोल; पण रेटून बोल अशी प्रवृत्ती आहे. शरद पवार, जर आरक्षणाच्या प्रश्नावर जनजागृतीसाठी देशभर सभा घेणार असतील, तर त्यांना उघडे पाडण्यासाठी आपण दुसर्या दिवशी तिथेच सभा घेवून ते कसे खोटे आहेत, ते लोकांच्या समोर आणू, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ही चेतावणी त्यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ज्यांच्याकडे राज्यात ५८ वर्षे सत्ता होती, त्या वेळी ते काहींच करू शकले नाहीत आणि ते आता अपयश लपवण्यासाठी दुसर्यावर खापर फोडत आहेत. आरक्षण या विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या समवेत ५ प्रमुख पक्षाच्या ५ नेत्यांची मंत्रालयात एकाच वेळी बैठक बोलवा, म्हणजे एकदाच सोक्षमोक्ष लागेल.