खाऊच्या (प्रसादाच्या) माध्यमातून सर्वांना चैतन्य देणारे आणि सतत इतरांच्या आनंदाचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमात केलेली ‘प्रसाद भांडार’ची निर्मिती !
१ अ. स्वतः दिलेल्या खाद्यपदार्थांना कधीच ‘प्रसाद’ न म्हणता ‘खाऊ’ म्हणणे : ‘खरे संत स्वतःला कधीच ‘संत’ म्हणत नाहीत, तसेच स्वतः दिलेल्या वस्तूला किंवा खाऊला ‘प्रसाद’ही म्हणत नाहीत. व्यक्तीला त्याच्या संतत्वाची अनुभूती आपोआप येते. साधक आणि भक्त यांना ‘संतांनी दिलेली वस्तू प्रसादस्वरूप आहे’, याची आपोआप अनुभूती येते. वर्ष १९९१ मध्ये मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात आले. तेव्हापासून आजपावेतो त्यांनी कधी स्वतः संत असल्याचे भासवले नाही कि कोणत्या प्रकारे तसे व्यक्त केले नाही. सर्वच साधकांना याची अनुभूती आली आहे. ते अत्यधिक प्रेमाने आणि कौतुकाने साधकांना ‘खाऊ’ देतात; पण ते त्याला कधीच ‘प्रसाद’ असे म्हणत नाहीत. साधकांना त्यांच्या भावानुरूप अनुभूती येते.
१ आ. प्रत्येकाच्या आवडीचा विचार करून तिखट-गोड खाऊ देण्याची अखंड सेवा करणारे ‘प्रसाद भांडार’ ! : समाजातील कोणतीही व्यक्ती एखाद्याला खाऊ देते, तेव्हा ती क्वचितच त्याची आवड अभ्यासून खाऊ देत असेल. परात्पर गुरु डॉक्टर मात्र प्रत्येक वेळी प्रत्येक साधकाला ‘तिखट किंवा गोड काय आवडते ?’, तोच पदार्थ ‘खाऊ’ म्हणून द्यायला सांगतात. याच कारणास्तव आश्रमात ‘प्रसाद भांडार’ची निर्मिती होऊन याच्याशी संबंधित अशा सेवांचा उदय झाला. तेथे साधक किंवा अन्य परिचित या सर्वांसाठी प्रसादस्वरूप ‘खाऊ’ देण्याची व्यवस्था अव्याहत चालू असते.
१ इ. समाजातील हितचिंतक, तसेच संत, अन्य संघटनांचे कार्यकर्ते, साधकांचे नातेवाईक, आश्रमात आलेल्या व्यक्ती, तसेच आश्रमदर्शनासाठी आलेले जिज्ञासू या सर्वांना प्रसादस्वरूप खाऊ दिला जाणे : या ‘प्रसाद भांडार’च्या अंतर्गत खाऊसह भेटवस्तूंचे नियोजनही केले जाते. समाजातील हितचिंतक, अन्य संत, अन्य संघटनांचे कार्यकर्ते, निवासी साधकांचे नातेवाईक, आश्रमात साहाय्यासाठी आलेल्या व्यक्ती, तसेच आश्रम पहाण्यासाठी आलेले जिज्ञासू या सर्वांना खाऊ दिला जातो. प्रसंगानुरूप भेटवस्तूही दिली जाते. याकडे परात्पर गुरु डॉक्टरांचे विशेष लक्ष असते. साधकांच्या आरोग्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी साहाय्य करणार्या वैद्यांना प्रतिवर्षी सनातन-निर्मित पंचांग, आश्रमाच्या बागेतील फळे, सणानुसार खाऊ-फराळ आदी नित्य नेमाने न चुकता दिले जाते. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःच्या कृतीतूनच सर्व उत्तरदायी साधकांना ही सवय लावली आहे.
१ ई. खाऊ देतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘लांबचा किंवा जवळचा प्रवास, दीर्घ काळ टिकणे’, असे निकष वापरायला शिकवणे : ‘एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास कसा करायचा ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी कृतीतून शिकवले. ‘लहान मुलांना चॉकलेट आवडते. प्रवासात तहान लागली, तर लिमलेट, पुष्कळ दिवस टिकण्यासाठी घट्ट आणि व्यवस्थित वेष्टन असलेल्या गोळ्या’, असे वर्गीकरण करून ‘खाऊ म्हणून गोळ्या (चॉकलेट) देणे’, हे मी आयुष्यात प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकले.
१ उ. दूरवर रहाणारे, तसेच विदेशातील साधक यांच्यासाठी अभ्यास करून दीर्घ काळ टिकणारा खाऊ बनवण्यास उद्युक्त करणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी स्थापन केलेल्या या छोट्याशा रोपाचे रूपांतर विशालकाय वृक्षात झाले, तसे पुष्कळ दूरदूरचे साधक, देश-विदेशांतील साधक आणि हितचिंतक सनातनच्या आश्रमांत येऊ लागले. घरी जातांना या सर्वांना ‘साधनेतील एखाद्या कृतीचे कौतुक म्हणून कोणता खाऊ देऊ शकतो ? जो दीर्घ काळ टिकेल ?’, याचा अभ्यास त्यांनी साधकांना करायला लावला. यातील प्रत्येक टप्प्यात त्यांनी स्वतः लक्ष घातले. विदेशातील साधकांना घरी पोचेपर्यंत, तसेच त्यांच्या केंद्रातील साधकांपर्यंत खाऊ पोचण्यास काही वेळा १ माससुद्धा लागतो. यावर उपाय म्हणून त्यांनी ‘साधकांनी नामजप करत आश्रमात ‘सात्त्विक बिस्किटे’ बनवणे’ हा पर्याय काढला.
१ ऊ. साधकांना खाऊ देतांना ‘ग्रामीण भागातील साधकाला ‘त्याला कधी न मिळणारा विदेशी खाऊ, तर विदेशी साधकाला घरी बनवलेला खाऊ’, असे देण्यामागे परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेला सर्वांगीण विचार ! : पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर ‘साधकांना कोणता खाऊ द्यायचा ?’, हे स्वतः ठरवत असत. एकदा ग्रामीण भागातील एक साधक आणि विदेशातील एक साधक अशा दोघांनाही खाऊ द्यायचा होता. त्या वेळी त्यांनी ग्रामीण भागातील साधकाला विदेशी चॉकलेट दिले आणि विदेशातील साधकाला घरगुती खाऊ दिला. प्रत्येक व्यक्तीचा सर्व अंगांनी विचार करून ‘तिला खाऊ कसा द्यायचा ?’, हे त्यांनी मला शिकवले. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील साधकाला विदेशातील वस्तू कोण कधी देणार ? आणि विदेशातील साधकाला बाजारातील विकतचा खाऊ नेहमीच मिळत असतो. त्यामुळे त्याला नेहमी घरी बनवलेला खाऊ द्यायचा.’’
२. विदेशातील साधकांना आवडीचे पदार्थ उपलब्ध करून देण्याची गुरुमाऊलीची धडपड
२ अ. विदेशातील साधक भारतात आल्यावर ‘त्यांना भारतातील फळे मिळावीत’, असा प्रयत्न करणे : विदेशातील साधक वर्षातून एकदाच आश्रमात येतात. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर तेथे न मिळणारी फळे त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायला सांगतात. हंगाम नसल्यास त्या त्या दिवसांत त्या फळांचा, उदाहरणार्थ आंब्याचा गर प्रक्रिया करून साठवून ठेवणे, ही संकल्पना परात्पर गुरु डॉक्टरांचीच आहे.
२ आ. ‘विदेशातील साधकांना आश्रमातील वातावरण त्यांच्या घराप्रमाणेच वाटावे; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यास सांगणे : विदेशातील साधकांना भारतीय खाद्यपदार्थांची ओळख नाही. त्यांना तिखट आणि मसालेदार अन्न पचत नाही. त्यांच्या जेवणा-खाण्याच्या सर्व सवयी वेगळ्या आहेत. हा सर्व भाग लक्षात घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांनी ते जेवढे दिवस भारतात वास्तव्यास असतात, तेवढे दिवस त्यांच्या आवडीचे आणि सवयीचे पदार्थ त्यांच्यासाठी बनवण्यास शिकवले. त्यांना आश्रमातील वातावरण त्यांच्या घराप्रमाणेच वाटावे; म्हणून ते त्यांच्या पद्धतीचे पदार्थ, उदा. सूप, सॅलड, पिझा, बे्रड, पॅटिस, केक, कुकीज इत्यादी पदार्थ बनवण्याचे नियोजन करायला सांगत.
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/503828.html