अफगाणिस्तान तालिबानचे ! पुढे काय ?
संपादकीय
अखेर तालिबानने अफगाणिस्तानवर अपेक्षेप्रमाणे नियंत्रण मिळवले. यासाठी तालिबानला विशेष विरोध झाला नाही. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी जाण्याच्या जवळपास एका मासामध्येच तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले. काबुलवर नियंत्रण मिळवतांना, तर तालिबानला अफगाण सैन्याकडून कोणताही प्रतिकार झाला नाही. देशातील अनेक ठिकाणी काही प्रमाणात अशीच स्थिती होती. यातून ‘२० वर्षे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैन्य राहूनही ते पराजित झाले आहे’, असेच आता म्हटले जात आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेची ही नामुष्की आहे. यापूर्वी छोट्याशा व्हिएतनामसमवेत झालेल्या युद्धातही अमेरिकेचा पराभव झाला होता. यातून अमेरिकेच्या सैन्यशक्तीचा फोलपणाही उघड होतो. वास्तविक अमेरिकेने या वेळी अण्वस्त्रांचा वापर केला नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. दुसर्या महायुद्धात जपानला शरणागती पत्करायला लावण्यात त्याच्या हिरोशिमा आणि नागासाकी येथील शहरांवर टाकण्यात आलेले अणूबॉम्ब हे एक कारण होते. तसा प्रयत्न अमेरिकेने केला नाही. अफगाणिस्तानमध्ये ते अशक्यच होते; कारण यात निरपराध अफगाणी नागरिकांचाच मृत्यू झाला असता. तरीही अमेरिकेच्या सैन्याचा हा पराभव आहे, हे स्पष्ट आहे. यावर अमेरिकेने म्हटले आहे, ‘तुम्ही आम्हाला ‘पराभूत’ म्हटले, तरी चालेल. आम्ही आमच्या देशाचा विचार करून माघार घेतली आहे.’ अमेरिकेच्या या म्हणण्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही; कारण वर्ष २००१ मध्ये अल् कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या इमारतींवर आक्रमण केल्यावर अमेरिकेने अल् कायदाला साहाय्य केल्यावरून अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीच्या विरोधात आक्रमण केले आणि तालिबानची सत्ता उलथवून टाकली; मात्र पुढील २० वर्षांत अमेरिका तालिबानचा संपूर्ण निःपात करू शकली नाही, हे वास्तव आहे. या २० वर्षांत अमेरिकेने अब्जावधी डॉलरचा व्यय केला आणि त्याला अमेरिकेतील नागरिकांचा नंतर विरोध होऊ लागला. यामुळेच अमेरिकेला माघारी येण्याचा निर्णय घ्यावा लागला.
अफगाणिस्तानमधील भौगोलिक परिस्थितीत युद्ध कसे करायचे, याविषयी अमेरिकी सैन्याला नसलेले ज्ञान आणि तालिबान्यांना पाकमधून मिळणारे साहाय्य हेच अमेरिकेच्या पराजयाचे कारण आहे. आताही पाकचे अनेक तरुण तालिबानच्या बाजूने लढत आहेत. यात पाकिस्तानी सैनिकही असल्याचे म्हटले जात आहे. मध्यंतरी अमेरिकेने ‘तालिबानच्या विरोधातील लढाईमध्ये भारताने सैन्य पाठवावे’, अशी मागणी केली होती; कारण भारतीय सैन्याला अफगाणिस्तानसारख्या देशातील भौगोलिक परिस्थितीमध्ये आणि गनिमी काव्याच्या विरोधात लढण्याचे ज्ञान आणि प्रशिक्षण आहे. भारताने मात्र अमेरिकेची ही मागणी मान्य केली नाही. याला अनेक कारणे आहेत; मात्र आताची स्थिती पहाता ‘भारताचा निर्णय चुकला का ?’ असेही म्हटले जात आहे. ‘भारतीय सैन्य तेथे गेले असते, तर कदाचित् तालिबानचा नायनाट झाला असता’, असा दावा करता येऊ शकतो. भारताने अफगाण सैन्याला सैनिकी साहाय्य केले होते, हेही विसरता येणार नाही.
भारताला धोका !
तालिबानची मागील राजवट अत्यंत अमानुष होती. तालिबानने शरीयत लागू करून त्यानुसार महिलांवर अत्याचार चालू केले होते. अन्य धर्मियांचाही वंशसंहार केला होता. आताही हीच स्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने सहस्रावधी अफगाणी नागरिक देशातून पलायन करत आहे. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केलेच आहे; मात्र नागरिकांची स्थिती वाईट आहे. तेथील लोक वाहनांद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काबुल विमानतळावर सहस्रावधी नागरिक गोळा झाले आहेत.
आता तालिबानची राजवट चालू झाल्यावर पाकच्या इशार्यावर आणि चीनची फूस मिळाल्यावर ते भारतावर आक्रमण करण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी ‘पुढील एका वर्षानंतर तालिबान, पाक आणि चीन भारतावर आक्रमण करू शकतात’, असे म्हटले आहे. ही स्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे आता भारताचा कसोटीचा काळ चालू झाला आहे. तिसरे महायुद्ध यांमुळेच चालू झाले, तर आश्चर्य वाटू नये. आतापर्यंत भारताने जो काही बचावात्मक पवित्रा घेतला, त्यामुळे भारताची हानीच झाली आहे. हा पवित्रा सोडून भारताने आक्रमक होत पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेऊन चीन आणि पाक यांच्यातील आर्थिक महामार्ग रोखला पाहिजे. याच मार्गाने चीन अफगाणिस्तानमध्ये जाणार आहे. जर भारताने असे केले नाही, तर चीन, पाक आणि तालिबानी यांचा या मार्गाद्वारे समन्वय राहून त्याद्वारे शस्त्रे पाठवली जाऊ शकतात. त्यामुळे आता भारताने धडक कृती करण्याची आवश्यकता आहे. या काळात कदाचित् तालिबानी आतंकवाद्यांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो, हेही लक्षात घ्यायला हवे. एकूणच भारत शांत राहिला, तर त्याला संकटाला सामारे जावे लागणार आणि आक्रमक राहिला, तर त्याला प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे, हे नाकारता येणार नाही आणि त्यात पालटही होणार नाही, हीच वस्तूस्थिती असणार आहे. यासाठी भारताने आता ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आज नाही, तर उद्या भारतावर हे संकट येणार आहे, हे त्यांनी आता लक्षातच ठेवायला हवे. जर तालिबान, पाक आणि चीन यांचा विचार पालटला आणि त्यांनी मध्यपूर्वेकडे मोर्चा वळवून इस्लामिक स्टेटशी हात मिळवणी करून इराक कह्यात घेण्याचा प्रयत्न केला, तरीही आश्चर्य वाटू नये. जागतिक समुदायाने तालिबान राजवटीची सर्व बाजूंनी कोंडी केली पाहिजे आणि त्याला जेरीस आणले पाहिजे. त्याच वेळी त्याला साहाय्य करणार्या पाक आणि चीन यांच्या विरोधातही कठोर होऊ पाकला तालिबानला साहाय्य केल्यावरून त्याला ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्याच्यावरही बहिष्कार घातला पाहिजे, असे होण्यासाठी तरी भारताने पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा.