खर्या अर्थाने स्वतंत्र होऊया !
१५ ऑगस्ट या दिवशी भारताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा आहे; कारण क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांनी प्रसंगी प्राण अर्पण करून इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला सोडवले. क्रांतीकारकांचा निस्वार्थ त्याग आणि समर्पण यांमुळे आपण स्वातंत्र्याचा सूर्य पहात आहोत. हे भारतियांसाठी अभिमानाने मान उंचवायला लावणारे आहे. असे असले, तरी अजूनही इंग्रजांनी भारतामध्ये पेरलेल्या त्यांच्या स्मृती उखडून टाकण्याचे काम ना शासनकर्त्यांनी केले, ना जनतेने, हे दुर्दैवी आहे. ही गोष्ट सर्वांनाच मान खाली घालायला लावणारी आहे. याची पुढील उदाहरणांवरून जाणीव होते.
अनेकांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा इंग्रजी भाषेत दिल्या, तसेच प्रतिदिन बोलतांना मातृभाषेचा वापर न करता इंग्रजीचा वापर अधिक करणे, ‘आई’ ऐवजी ‘मम्मी’ म्हणणे, दुकानांना नावे इंग्रजीत देणे, भारतीय संस्कृतीनुसार सात्त्विक पोषाख न करता पाश्चात्त्यांप्रमाणे पोषाख करणे, केक कापून आणि मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करणे, वेगवेगळ्या ‘डे’ संस्कृतींचा उदोउदो करणे या अन् यांसारख्या अनेक गोष्टींचे आपण अनुकरण करत आहोत. इंग्रजांनी ‘गुरुकुल’ शिक्षणपद्धत बंद करून मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत चालू केली. या माध्यमातून इंग्रजांनी आदर्श पिढी बनवण्याला खिळ घातली. ही सर्व उदाहरणे पाहिल्यास अजूनही आपण मानसिकदृष्ट्या इंग्रजांच्या गुलामगिरीतच आहोत. आपला देश म्हणजे विविधतेत एकता असणारा आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी असली, तरी राष्ट्रप्रेमाची भावना एकच आहे. त्यामुळे ती भावना व्यक्त करण्यासाठी आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातृभाषेचा वापर केला असता, तर भाषिक स्वातंत्र्य तरी अनुभवले असते. असो !
पुढील पिढीला गुलामगिरीच्या मानसिक बंधनातून बाहेर काढून खर्या अर्थाने स्वतंत्र केले पाहिजे. इंग्रजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा निश्चिय करूया. भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगून सर्वच क्षेत्रांत त्याचा वापर होण्यासाठी आग्रही होऊया. हिंदु धर्माचे आचरण करणारा आणि महासत्ता असणारा भारत पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने हिंदु धर्मानुसार आचरण करून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे ध्येय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उराशी बाळगूया.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी