कर्करोगाच्या रुग्णांनी अधिक प्रमाणात शेंगदाणे सेवन केल्यास संपूर्ण शरिरात कर्करोग पसरण्याचा धोका वाढू शकतो ! – संशोधकांचा दावा
नवी देहली – कर्करोगाच्या रुग्णांनी अधिक प्रमाणात शेंगदाणे (भुईमूग) सेवन केल्यास त्यांच्या संपूर्ण शरिरामध्ये कर्करोग पसरण्याचा धोका वाढू शकतो, असा दावा इंग्लंडच्या ‘लिव्हरपूल विद्यापिठा’चे संशोधक लू-गँग यू यांनी केला आहे. ‘हे वृत्त चिंताजनक असले, तरी खरे आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी वारंवार शेंगदाणे सेवन करणे टाळले पाहिजे’, असे लू-गँग यू यांनी म्हटले आहे.
१. ‘कार्सिनोजेनेसिस’ या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार शेंगदाणे सेवन केल्यानंतर ‘पिनट एग्लूटिनीन’ नावाचे प्रोटीन रक्तामध्ये मिसळून संपूर्ण शरिरामध्ये पसरते. त्यानंतर ते रक्ताच्या माध्यमातून कर्करोगाच्या गाठींपर्यंत पोचते आणि त्यांना शरिराच्या दुसर्या भागामध्ये पसरण्यासाठी दबाव निर्माण करते. त्यामुळे त्या गाठी रुग्णाच्या शरिराच्या इतर भागामध्ये पसरण्याचा प्रयत्न करतात.
२. लू-गँग यू यांनी म्हटले की, शेंगदाणे अधिक खाणार्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता किती वाढते, याविषयी समजू शकले नाही.
३. संशोधकांच्या मते, ज्या कर्करोगाच्या रुग्णांनी एका दिवसामध्ये २५० ग्रॅम शेंगदाणे सेवन केले, त्यांना अधिक प्रमाणात धोका दिसून आला. त्यामुळे अशा धोक्यांपासून वाचण्यासाठी व्यक्तीने दिवसभरामध्ये २८ ग्रॅमपेक्षा अधिक शेंगदाण्यांचे सेवन करू नये. एका शेंगदाण्यामध्ये त्याच्या वजनाच्या ०.१५ टक्क्यांपर्यंत प्रोटीन असते.