भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार असणार्या निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने अभिवादन !
कोल्हापूर, १६ ऑगस्ट – निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. याचे अनावरण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी झाले होते. अशा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास १५ ऑगस्टला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.
या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘इतिहासाचा साक्षीदार असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कोल्हापूरची अस्मिता आणि ओळख आहे. कलामहर्षि बाबुराव पेंटर यांनी ही मूर्ती केली आहे. हा ऐतिहासिक पुतळा आणि परिसर यांचे ५० लाख रुपये देऊन सुशोभिकरण करण्यात आले.’’ या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. जयवंत हारुगले, श्री. किशोर घाटगे, सर्वश्री तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, कपिल सरनाईक, शैलेंद्र गवळी, सतीश पाटील यांसह अन्य उपस्थित होते.