नागपूर येथे ‘एस्.टी.’ महामंडळाकडून जिवंत निवृत्त कर्मचारी मृत घोषित !
|
नागपूर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (‘एस्.टी’च्या) येथील विभागातील निवृत्त कर्मचारी राजेश बंगाले यांना महामंडळातील अधिकार्यांच्या चुकीमुळे मृत घोषित करण्यात आले आहे. निवृत्तीनंतर अंतिम रोखीकरण रजेविषयीच्या आदेश पत्रात हा प्रकार निदर्शनास आला आहे. बंगाले हे ३१ मे २०२१ या दिवशी ‘एस्.टी.’च्या सावनेर आगारातून वाहतूक नियंत्रक या पदावरून (तात्पुरते) निवृत्त झाले होते. बंगाले ठणठणीत असतांना या पत्रात त्यांचा मृत्यू झाल्याचे दर्शवल्याने कामगार संतप्त झाले आहेत.
निवृत्तीच्या कालावधीच्या वेळी त्यांच्या ४४ सुट्ट्या शिल्लक होत्या. या सुट्ट्यांचे अंतिम रोखीकरण रजा दिवस या खात्याअंतर्गत संबंधिताला पैसे मिळतात. त्याविषयी ‘एस्.टी.’च्या नागपूर विभाग कार्यालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, बंगाले यांचे निधन झाले आहे. त्यांच्या खात्यात शिल्लक असलेल्या अंतिम अर्जीत रजेचे मध्यवर्ती कार्यालयाच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार अंतिम अंकेक्षण अंती रोखीकरण करण्यात येत आहे. या आदेशावर लेखापाल आणि विभाग नियंत्रक यांचीही स्वाक्षरी आहे. या विषयावरून विभाग नियंत्रक कार्यालयात काही कामगारांत वादही झाला; परंतु काहींनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला.
‘‘लिपिकाकडून पत्र टंकलेखन करतांना अनावधानाने राजेंद्र बंगाले यांचे नाव आदेशात लिहिले गेले; परंतु हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने दुरुस्ती करून शुद्धीपत्रकही काढले आहे. कुणाला मनस्ताप व्हावा, असा कुणाचाही उद्देश नव्हता. पुढे प्रत्येक पत्राविषयी विशेष काळजी घेतली जाईल.’’ – शैलेश भारती, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी (नागपूर विभाग) |