व्यापकत्व, दूरदृष्टी, अल्प अहं आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेले एक आगळे व्यक्तीमत्त्व – ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुबोध नवलकर !
‘परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी माझ्याकडून ‘माझे यजमान ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुबोध नवलकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लिहून घ्यावीत’, अशी प्रार्थना करते.
१६ ऑगस्ट २०२१ या दिवशी कै. सुबोध नवलकर यांचा जन्म, नोकरी, धडाडीने केलेला व्यवसाय आणि इराक-कुवेत युद्धकाळात भारतियांच्या सुरक्षेसाठी केलेले कौतुकास्पद प्रयत्न ही सूत्रे पाहिली. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/503200.html
८. सातत्याने इतरांना साहाय्य करण्यासाठी धडपडणे
८ अ. सुरतमध्ये ‘स्वाईन फ्लू’ची साथ पसरल्यावर त्याचा परिणाम प्रवासी आस्थापने आणि हॉटेल यांच्या व्यवसायावर होणे : आखाती युद्धानंतर सुरतमध्ये ‘स्वाईन फ्लू’ची साथ पसरली. त्याचा परिणाम विमान आस्थापने आणि हॉटेल्स या उद्योगांवर झाला. त्या उद्योगपतींनी नवलकरांकडे, म्हणजे त्यांच्या ‘असोसिएशन’कडे धाव घेतली. भारतात येणार्या प्रवाशांनी विमाने आणि हॉटेल्सची आरक्षणे रहित करायला चालू केले.
८ आ. नवलकरांनी ‘स्वाईन फ्लू’चा प्रभाव केवळ सुरत आणि आसपासच्या गावांपुरताच मर्यादित असल्याचा निष्कर्ष पूर्ण अभ्यासाअंती मांडून त्याचे इतिवृत्त ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’लाही पाठवणे, त्यामुळे पुन्हा सर्व व्यवसाय व्यवस्थित चालू होणे : नवलकरांनी सर्वत्र चौकशी करून अभ्यास केला आणि स्वतःचे निरीक्षण पत्रकार परिषदेत मांडले. ‘स्वाईन फ्लू’चा प्रभाव केवळ सुरत आणि आसपासच्या गावांपुरताच मर्यादित असून अन्यत्र कुठेही त्याचा त्रास नाही आणि तिथे जो काही त्रास होता, तोही आता आटोक्यात आला आहे’, हे त्यांनी पुराव्यांसह सिद्ध केले. त्यांनी त्याचे इतिवृत्त (रिपोर्टिंग) ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (WHO) लाही पाठवले. त्यात त्यांनी ‘स्वाईन फ्लू’चा प्रसार भारतातील सुरत वगळता अन्य कुठल्याही नगर किंवा महानगर येथे झाला नाही’, असा उल्लेख केल्यामुळे पुन्हा सर्व विमाने आणि हॉटेल्स पूर्ववत् चालू झाले. सर्वांनी नवलकरांचे आभार मानले आणि त्यांचे पुष्कळ कौतुकही केले.
८ इ. सौदी अरेबियामध्ये जाण्याच्या व्हिसाची ‘फी’ अकस्मात् वाढवल्यावर नवलकरांनी सौदीच्या राजांशी पत्रव्यवहार करून ती न्यून करून घेणे : एकदा सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी जाणार्या भारतियांची ‘व्हिसा फी’ ३०० रुपयांवरून अकस्मात् १० सहस्र रुपये करण्यात आली. त्या वेळी नवलकरांनी सौदीच्या राजाला पत्र पाठवून ‘भारतीय श्रमिकवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बळ (गरीब) आहे. तो एवढे शुल्क देऊ शकणार नाही. ते त्यांच्या कुटुंबियांना सोडून एवढ्या लांब केवळ पैसे मिळवण्यासाठी येतात’, असे कळवले. त्यावर सौदीच्या राजाने त्यांच्या ‘कॉन्स्युलेट’ला पत्र पाठवून शुल्क न्यून केले आणि नवलकरांचे आभार मानले.
८ ई. विदेशात नोकरीसाठी जाणार्या आणि खरोखरीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना साहाय्य करणे : आम्ही सर्वच स्तरांतील मनुष्यबळ नोकरीसाठी विदेशात पाठवायचो. त्यात श्रमिक वर्गही असायचा. काही लोक ग्रामीण भागातून यायचे. त्यांच्याकडे रहायला आणि खायलाही पैसे नसायचे. हे नवलकरांच्या लक्षात आल्यावर ते त्यांना सर्व प्रकारे साहाय्य करायचे. काही जणांकडे चप्पलही नसायची. त्या वेळी ते कार्यालयातील कर्मचार्याला त्या व्यक्तीसह पाठवून तिला आवश्यक ते साहित्य घेऊन द्यायला सांगायचे. अशा प्रकारे ते स्वतःचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व समजून प्रत्येकाच्या साहाय्याला धावून जायचे.
८ उ. व्यवसाय वैध मार्गाने करण्यासाठी प्रयत्न करणे आणि अवैध मार्गाने व्यवसाय करणार्यांवर चाप लावणे : त्यांनी ‘रिक्रुटमेंट’ व्यवसायाला एक वेगळीच मान्यता आणि प्रतिष्ठा (स्टेट्स) मिळवून दिली. त्यामुळे समाजाचा ‘रिक्रुटींग एजंट’कडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला. ‘सार्क’ आणि आशियातील महिलांना आखाती देशांत पाठवतांना अवैध मार्गांनी पाठवले जायचे. त्यासाठी त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वैधानिक उपाययोजना केली. त्यामुळे अयोग्य रितीने व्यवसाय करणारे, लोकांना फसवणारे आणि दलाल यांना चांगलाच चाप बसला. त्यांनी सर्व व्यवहार वैध मार्गाने होण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा लाभ निर्धन श्रमिकांना झाला.
९. अल्प अहं
९ अ. अनेक राजकीय धुरिणांशी जवळीक असूनही त्याविषयी प्रौढी न मिरवणे : कार्याच्या निमित्ताने त्यांच्या अनेक देशांच्या राजदूतांशी भेटीगाठी व्हायच्या. त्यांच्या समवेत त्यांची छायाचित्रेही काढली जायची. वर्ष १९९३ मध्ये केंद्रीय श्रममंत्री पी.ए. संगमा यांच्याशी त्यांची पुष्कळ जवळीक होती. त्यांची मुलगी आणि मेघालयाच्या अन्य एका मंत्र्यांची मुलगी मुंबईत शिक्षणासाठी होत्या. त्यांचे स्थानिक पालकत्व आम्ही घेतले होते; परंतु या सगळ्याची त्यांनी कधी प्रौढी मिरवली नाही कि त्यांच्या अधिकाराचा कधी अपवापरही केला नाही.
९ आ. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांना पुष्कळ मान होता; परंतु त्यांना त्याचा मुळीच अहंकार नव्हता.
९ इ. ‘नवलकरांचा अहं अल्प आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी कौतुक करणे : त्यांचे देश-विदेशांत अनेक मान्यवरांकडून सत्कार झाले. त्याविषयी वर्तमानपत्रातून छायाचित्रांसह ती वृत्ते छापून यायची; परंतु त्यांना त्याचा कणभरही अहं नव्हता. सिंगापूरच्या राज्यपालांनी त्यांना तेथील मानाचे चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला होता. ते छायाचित्र पहातांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘या छायाचित्राकडे पाहून ‘नवलकरांचे मन निर्मळ आहे’, हे जाणवते. त्यांच्यामध्ये थोडासुद्धा अहं जाणवत नाही. त्यामुळे ते सात्त्विक वाटतात. दुसर्या व्यक्तीचे छायाचित्र रजोगुणी आणि तामसी वाटते.’’ ते ऐकून माझा भाव जागृत झाला. प्रसिद्ध गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नवलकरांच्या हस्ते ‘ब्रीज’ या संस्थेकडून मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्या छायाचित्रामध्येही त्यांचा लतादीदींविषयी आदरयुक्त भाव दिसतो.
९ ई. आश्रमात सर्वांशी जुळवून घेणे : नंतर देवद आश्रमात निवासाला आल्यावर त्यांनी सर्वांशी जुळवून घेतले. ‘मी कुणीतरी मोठा आणि प्रतिष्ठित आहे’, असे कुठेही त्यांनी वागणे किंवा बोलणे यांतून कुणालाही जाणवू दिले नाही.
१०. अन्य गुण
१० अ. आनंदी : नवलकरांची दृष्टी अधू असल्याने त्यांना कुठलीही कृती करण्यासाठी मर्यादा असायच्या; परंतु त्यांनी त्याचा बाऊ केला नाही आणि त्याविषयी कधी वाईटही वाटून घेतले नाही. ते प्रत्येक प्रसंगात आनंदी असायचे.
१० आ. जवळीक करणे : त्यांचे सर्वच स्तरांतील आणि वयोगटातील लोकांशी वागणे-बोलणे सारखेच असायचे. त्यांनी कधी लहान-मोठा असा विचार केला नाही. ते लहान मुलांनाही विनोद आणि गोष्टी सांगायचे. त्यामुळे घरी आलेल्या नातेवाइकांची, पाहुण्यांची मुले किंवा समाजातील मुले यांचा त्यांच्याभोवती नेहमी गराडा असायचा.
१० इ. लेखन कौशल्य : भारतीय सण-उत्सव यांवर ‘फेस्टिवल्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिणे आणि याचे फ्रेंच भाषेतही भाषांतर होणे : यात्रा आस्थापनाच्या व्यवसायामुळे देश-विदेशांतील अनेक लोकांशी त्यांचा संपर्क येत असे. पॅरीस-फ्रान्स येथील जॅक्वेश शेगारे या प्रवाशाने त्यांना ‘भारतीय सण-उत्सव’ या विषयावर विदेशी लोकांसाठी एक पुस्तक लिहायला सुचवले. नेहमीप्रमाणे नवलकरांनी ते अत्यंत उत्साहाने मनावर घेतले आणि ‘फेस्टिवल्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या छायाचित्रकार मित्राला आपल्या समवेत घेऊन त्याच्याकडून श्री गणेशोत्सव, दहीहंडी, पतंगोत्सव, विवाहविधी, मौजीबंधन इत्यादी प्रसंगांची छायाचित्रे काढून घेतली आणि ती त्या पुस्तकात छापली. शेगारे यांनी या पुस्तकाचे फ्रेंच भाषेतही भाषांतर केले. ते पुढे काही वर्षे नियमितपणे नवलकरांना त्या पुस्तकाचे मानधन (रॉयल्टी) पाठवत होते.
१० ई. व्यापक दृष्टीकोन आणि दूरदृष्टी
१. पूर्वी मला विज्ञापनांची देयके, पावत्या आणि अंक पाठवतांना आमच्या कार्यालयातील निरोप्याचे (शिपायाचे) किंवा गाडीचालकाचे साहाय्य घ्यावे लागायचे. काही अंक किंवा देयके इत्यादी बाहेरगावी ‘कुरिअर’ने पाठवावे लागायचे. त्या वेळी नवलकर म्हणाले होते, ‘‘आपली सनातनची ‘कुरिअर सर्व्हिस’ असली पाहिजे. उद्या आपला व्याप वाढणार आहे. त्यासाठी पूर्वसिद्धता केली पाहिजे.
२. आपली स्वतःची ‘टिकेटींग एजन्सी’ आणि प्रवासी आस्थापनही असले पाहिजे. भारत किंवा विदेश येथे प्रवास करणार्या आपल्या साधकांना ते सोयीचे होईल आणि त्यातून अर्थार्जनही घडेल.
३. सनातन संस्थेने ‘भाज्या आणि औषधी वनस्पती लावणे, प्रवासी आस्थापन, कुरिअर एजन्सी, तेलाचा घाणा, स्वतःचा छापखाना इत्यादी उभारावे.
सनातन संस्था स्वावलंबी असावी. उद्या येणार्या हिंदु राष्ट्रासाठी तो एक आदर्श असेल’’, असा त्यांचा व्यापक दृष्टीकोन अन् दूरदृष्टी होती.
११. नवलकरांनी केलेली समष्टी सेवा
११ अ. प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून उच्चभ्रू वर्गात प्रसार केल्यावर प्रतिसाद मिळणे : सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर आरंभी ते इंग्रजीभाषिक सत्संगाला जाऊ लागले. नंतर थोड्याच दिवसांत कुलाबा आणि चर्चगेट येथे सत्संग चालू झाले. ते स्थानिक साधकांसह सत्संगाच्या प्रसाराला जायचे. तेव्हा साधक म्हणायचे, ‘येथील उच्चभ्रू लोक आपल्याला प्रतिसाद देणार नाहीत.’ त्या वेळी ते म्हणायचे, ‘प.पू. गुरुदेव आहेत ना ! आपण जाऊया.’ त्यांनी श्रीमती अनु परसराम, अनिता बालानी, सौ. वर्षा ठकार, डॉ. रश्मी आदी साधिकांसह प्रसारसेवा केली. तेव्हा काही लोक त्यांना आत बोलावून विषय जाणून घ्यायचे.
११ आ. चर्चगेट येथील सत्संग घ्यायला साधक उपलब्ध नसतांना डोळ्यांचा त्रास असूनही नवलकरांनी परात्पर गुरु डॉक्टरांची ‘शंकानिरसन’ ही ध्वनीफीत ऐकून २ मास सत्संग घेणे : एकदा चर्चगेट येथील सत्संग घेणारी साधिका २ मासांसाठी विदेशात गेली होती आणि तो सत्संग घ्यायला इतर कुणी साधक नव्हता. त्या वेळी नवलकरांनी ‘शंकानिरसन’ ही प.पू. गुरुदेवांच्या आवाजातील ध्वनीफीत (कॅसेट) ऐकून ती आमच्या कार्यालयीन कर्मचार्यांकडून मोठ्या अक्षरांत टंकलिखित करून घेतली; कारण त्यांना डोळ्यांच्या त्रासामुळे वाचायला अडचण येत होती. अशा प्रकारे त्यांनी पूर्वसिद्धता करून पुढे २ मास सत्संग घेतला.
११ इ. नवलकरांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘आजचे कार्यक्रम’ या स्तंभांतर्गत सत्संगाविषयी विज्ञापन देणे, ते वाचून तेथील एक वार्ताहर मुलगी सत्संगांना येणे आणि त्यामुळे ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये अध्यात्माविषयी लिखाण छापून येणे : त्या वेळी त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘आजचे कार्यक्रम’ या स्तंभांतर्गत या सत्संगाविषयी विज्ञापन द्यायला चालू केले. त्यामुळे तेथील एक वार्ताहर मुलगी सत्संगाला यायला लागली. नंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ‘स्पिकिंग ट्री’ (Speaking Tree) अशा मथळ्याखाली अध्यात्मावर लिखाण छापणे चालू केले. त्या वार्ताहर मुलीने परात्पर गुरु डॉक्टरांशी वार्तालाप करण्याची इच्छा दर्शवली. त्या वेळी प.पू. गुरुदेव कुणाशीही अशा प्रकारे वार्तालाप करत नसत; परंतु त्यांनी त्या मुलीला वेळ दिला आणि त्यांचे वक्तव्य पूर्ण पानभर छापूनही आले. याविषयी अन्य साधक प.पू. गुरुदेवांना म्हणाले, ‘‘तुम्ही कुणाशीही आजपर्यंत असा वार्तालाप केला नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नवलकरांची तळमळ आणि त्या मुलीची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के असल्यामुळे मी तिच्याशी वार्तालाप केला.’’ त्या वेळी नवलकरांना फार आनंद झाला.
१२. देवद आश्रमात केलेली सेवा
आरंभी नवलकर अरविंद गाडगीळ (६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अरविंद गाडगीळ) यांच्या समवेत सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने विदेशात पाठवण्याची सेवा करायचे आणि उरलेल्या वेळेत उत्पादनांची सेवा करायचे.
१३. देवावरील दृढ श्रद्धा
नवलकरांचे मन निर्मळ होते. ते सर्वांवर लगेच विश्वास ठेवायचे. त्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी त्यांची फसवणूकही केली; परंतु त्यांनी ते कधीच मनाला लावून घेतले नाही. मी काही वेळा त्यांना रागवायचे; पण ते म्हणायचे, ‘‘तू कशाला काळजी करतेस ? आपल्या समवेत देव आहे ना !’’ त्यांची देवावर दृढ श्रद्धा होती. पुढे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर त्यांची प.पू. गुरुदेवांवर अशीच श्रद्धा होती.
१४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने कोलकात्याचा विमानप्रवास करतांना विमानतळावर आणि पूर्ण प्रवासात कर्मचार्यांनी स्वतःहून साहाय्य केल्याची अनुभूती येणे
वर्ष २००६ च्या दिवाळीला आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी नवलकरांनी ‘मी कार्यालयीन वसुलीसाठी कोलकात्याला जाणार आहे’, असे प.पू. गुरुदेवांना सांगितले. त्यांना डोळ्यांचा त्रास असल्याने प.पू. गुरुदेवांनी विचारले, ‘‘कसे जाणार ? सोबत कोण आहे ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही आहात की !’’ यावर प.पू. गुरुदेव हसले. नंतर ते कोलकात्याला जाण्यासाठी विमानतळावर पोचले. तेव्हा साहाय्य न मागताही ‘एअरलाईन्स’चा कर्मचारी त्यांच्या जवळ आला आणि त्यांची विचारपूस करून त्याने त्यांची ‘बॅग’ घेतली. ‘चेक इन’ करून त्यांना विमानात आसनापर्यंत पोचवले. नंतर कोलकाता विमानतळावर तेथील कर्मचारी ‘नवलकर कोण आहेत ?’, असे शोधत आला आणि त्याने त्यांना वाहनापर्यंत नेऊन सोडले. पुढे नियोजित ठिकाणी पोचल्यावरही प्रत्येक वेळी त्यांना असेच साहाय्य मिळत गेले. परतीच्या प्रवासातही तसेच झाले. विमानतळावर मी त्यांना आणायला गेले. तेव्हा या सर्व अनुभूती सांगतांना त्यांचा प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव दाटून आला आणि भावाश्रू आले. हे सर्व ऐकतांना माझाही भाव जागृत झाला आणि प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली.
१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव
१५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावामुळे आश्रमजीवनाशी सहजतेने तादात्म्य पावणारे नवलकर ! : आमचे रहाणीमान, आहार आणि आश्रमातील आहार यांत पुष्कळ अंतर होते. आरंभी नवलकरांच्या आवडी-निवडी फार असल्याने ‘त्यांना आश्रमातले जेवण चालेल का ?’, असा मला ताण यायचा. त्यामुळे नवलकर जेवणाचे ताट वाढून घेतांना मी जवळ थांबत नसे. काही दिवसांनी मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला काही भाज्या आवडत नाहीत आणि ताटामध्ये २ भाज्या, सूप, कोशिंबीर किंवा सॅलड लागते. त्यामुळे आता हे पदार्थ खातांना तुम्हाला अडचण येत असेल.’’ त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘आयुष्यभर मी भरपूर खाल्ले आहे. मला आता त्याची आठवण येत नाही आणि हे अन्न मी ‘प.पू. गुरुदेवांचा महाप्रसाद’ म्हणून ग्रहण करतो. तू स्वतःला दोष देऊ नकोस.’’ त्या वेळी मी निश्चिंत झाले आणि प.पू. गुरुदेवांनी त्यांच्यात घडवून आणलेल्या परिवर्तनाविषयी मला कृतज्ञता वाटली.
१५ आ. गुरुमाऊलीची प्रीती मिळाल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजणे : त्यांच्या देवद आश्रमातील वास्तव्यात आणि रुग्णावस्थेत साधकांनी केलेल्या सेवेविषयी साधक आणि प.पू. गुरुदेव यांच्याप्रती त्यांना कृतज्ञता वाटायची. ते नेहमी म्हणायचे, ‘आपली श्री गुरुमाऊली किती महान आहे’, याची तू सदैव जाणीव ठेव. आपण अत्यंत भाग्यवान आहोत. मी सारे जग फिरलो; परंतु असा देव आणि त्याची प्रीती मला कुठेच अनुभवायला मिळाली नाही !’
१६. नवलकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. नवलकरांचा परिस्थिती स्वीकारणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, इतरांना समजून घेणे आदी भाग फारच चांगला होता. त्यांच्यामध्ये नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, संवादकौशल्य इत्यादी उत्तम गुण होते. त्यांच्यामुळेच हे गुण माझ्यामध्येही आले. त्यांच्या गुणांमुळे मलाही ‘सर्वांमध्ये मिसळणे, ‘प्रतिष्ठित व्यक्तींशी कसे बोलावे ?, सर्व स्तरांतील लोकांशी कसे जुळवून घ्यावे ?’, इत्यादी गोष्टी शिकायला मिळाल्या.
आ. मनमिळाऊ स्वभाव आणि संवादकौशल्य यांमुळे त्यांचा जनसंपर्क पुष्कळ मोठा होता. त्याचा उपयोग मला अध्यात्मप्रसारासाठी आणि जनसंपर्क सेवेसाठी सदैव होत असतो. विशेषतः सध्या अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागासाठी होत आहे.
इ. ते सतत व्यावसायिक दौर्यावर असल्याने मला आमचे कार्यालय सांभाळावे लागायचे. त्याचा लाभ मला सनातनच्या नियतकालिकांसाठी घेतल्या जाणार्या विज्ञापनांची कार्यपद्धत बसवण्यासाठी झाला.
नवलकरांमुळे मला देश-विदेशांत प्रवास करता आला. अनेक प्रेक्षणीय स्थळे पहाता आली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.’
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद पनवेल. (२९.११.२०२०) (समाप्त)