कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे घोषित केलेले वेळापत्रक म्हणजे निवळ थाप ! – डॉ. सायरस पूनावाला, संस्थापक अध्यक्ष, सिरम इन्स्टिट्यूट
पुणे – सध्या होणारे कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन पहाता लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे घोषित केलेले वेळापत्रक म्हणजे निवळ थाप आहे, असे मत सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी सांगितले. ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय सन्मानाने डॉ. पूनावाला यांना गौरवण्यात आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाचा संसर्ग, दळणवळण बंदी आणि लसींच्या संदर्भातील अनेक सूत्रांवर डॉ. पूनावाला यांनी भूमिका मांडली. सतत दळणवळण बंदी असल्यास लोकांमध्ये समूह प्रतिकारशक्ती (‘हर्ड इम्युनिटी’) निर्माण होण्यास अडचण येईल, असेही त्यांनी सांगितले.
पूनावाला पुढे म्हणाले की,
१. लसीच्या निर्यात बंदीमुळे लस निर्यात करण्यास अडचणी येत आहेत. जगभरातील १५० देश लसींच्या प्रतीक्षेत असल्यामुळे सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी.
२. मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीची तपासणी चालू आहे.
३. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर सहा मासांनी शरिरात निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचे प्रमाण अल्प होत असल्याने लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर पुन्हा सहा मासांनी बूस्टर डोस घ्यायला हवा.