कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी नगर जिल्हा परिषदेकडून योजनांची आखणी !
नगर – कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी नगर जिल्हा परिषदेने योजनांची आखणी केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनासमोर झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह ‘एकल महिला पुनर्वसन समिती’चे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
या वेळी समितीने काही मागण्या केल्या. त्यामध्ये अंगणवाडीसेविका भरतीसह सरकारच्या विविध योजनांचा लाभ देतांना या महिलांना प्राधान्य द्यावे, विधवा महिलांचे सर्वेक्षण व्हावे, पंधराव्या वित्त आयोगात महिलांसाठी उपलब्ध असलेल्या रकमेचा व्यय या महिलांसाठीच करावा. यासह इतर मागण्याही या वेळी करण्यात आल्या. यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केली. समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन विधवा महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी ‘टास्क फोर्स’ने पुढाकार घ्यावा आणि जिल्ह्याच्या ‘टास्क फोर्स’मध्ये विधवांसाठी काम करणार्या समिती सदस्यांचा समावेश करावा, अशा मागण्या केल्या.