संभाजीनगर येथे राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन !
संभाजीनगर – ‘राज्यातील सर्व मंदिरे खुली करावीत’, या मागणीसाठी १६ ऑगस्ट या दिवशी येथील श्री घृष्णेश्वर मंदिराच्या बाहेर भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावर अभिषेक केला. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील मंदिरे बंद असून ४ मासांहून तीर्थक्षेत्रांतील दुकानदारांची उपासमार चालू आहे. मंदिरांविषयी आकस का ? ‘मंदिरे चालू करण्याविषयी देवाने सरकारला सद्बुद्धी देऊन लवकरात लवकर मंदिरे खुली करावीत’, अशी प्रार्थना आंदोलकांनी केली.
श्रावण सोमवारी मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा असते; परंतु कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; मात्र राज्यात अनेक जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असून तेथे सर्व व्यवहार चालू झाले आहेत. इतर गोष्टी चालू करण्याला मुभा दिली जाते; मात्र मंदिरे खुली केली जात नाहीत. त्यामुळे भाविकांमध्ये अप्रसन्नता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.