आनंदी आणि भावपूर्ण सेवा करणार्या संभाजीनगर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनिता सराफ (वय ४९ वर्षे) !
१. आनंदी
‘सराफकाकूंचा तोंडवळा नेहमी हसरा असतो. त्यांच्याशी बोलतांना आनंद जाणवतो. त्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलतात.
२. प्रेमभाव
काकू सुनेवर मुलीप्रमाणे प्रेम करतात.
३. सेवेची तळमळ
३ अ. धर्मसत्संगातील स्त्रियांनी सध्याच्या आपत्काळात सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणे आणि तशी कृती करणे : काकू एक धर्मसत्संग घेत होत्या. ‘धर्मसत्संगातील स्त्रियांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी त्यांना आणखी काय सांगू ?’, असे त्या विचारून घ्यायच्या. काकूंनी सत्संगातील स्त्रियांना अर्पण करण्याचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी लागणारा खाऊ करून घेतला. काकूंच्या तळमळीमुळे या धर्मसत्संगातील स्त्रिया आता सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकतात आणि तशी कृती करतात.
३ आ. जिज्ञासूंशी चांगल्या प्रकारे संपर्क करणे : त्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी येणार्या जिज्ञासूंना तळमळीने माहिती सांगायच्या. काकू जिज्ञासूंना चांगल्या प्रकारे संपर्क करतात. त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांनाही चांगल्या प्रकारे जोडून ठेवले आहे.
३ इ. काकू विविध सेवा आणि उपक्रम यांमध्ये लगेच सहभागी होतात.
३ ई. साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा भावपूर्णरित्या घेणे : काकू साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा ‘ऑनलाईन’ घेतात. पूर्वी काही साधक अनियमित आढावा द्यायचे; परंतु सराफकाकूंनी आढावा घ्यायला चालू केल्यापासून साधकांना आढावा देण्याची ओढ लागलेली असते. ‘काकू साधकांचा घेत असलेला आढावा म्हणजे भाववृद्धी सत्संग आहे’, असे वाटते.
३ उ. ‘कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने साधना करावी’, याची तळमळ : ‘कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने साधना करावी आणि स्वतःच्या व्यष्टी साधनेचा आढावा द्यावा, गुरुपौर्णिमा महोत्सव अन् हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी सेवा करावी’, अशी काकूंची तळमळ असते. काकूंच्या या तळमळीमुळेच आताच्या आपत्काळात गुरुमाऊलीच्या कृपेने त्यांच्या कुटुंबातील सदस्य व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे देतात.
४. स्वीकारण्याची वृत्ती
एखाद्या प्रसंगात काकूंच्या मनाविरुद्ध घडले, तरी काकू ते स्वीकारतात. त्यांच्या मनात त्याविषयी प्रतिक्रिया येत नाहीत किंवा प्रतिक्रिया आल्यास त्या अल्प काळ टिकतात. काकू त्यांच्या लक्षात आलेली आणि इतरांनी लक्षात आणून दिलेली चूक किंवा अन्य कोणतेही सूत्र मनापासून स्वीकारतात. त्या परेच्छेने वागतात.
५. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांवर दृढ श्रद्धा
५ अ. सुनेच्या गरोदरपणात तिला नामजपादी आध्यात्मिक उपाय करायला सांगून स्थिर रहाणे : काकू घरातील कठीण प्रसंगातही गुरुदेवांवर असणार्या श्रद्धेमुळे स्थिर असतात. काकूंची सून गरोदर असतांना बाळाची चांगली वाढ होण्याच्या संदर्भात पुष्कळ अडचणी आल्या होत्या. त्या वेळी घरातील सर्वांना काळजी वाटत असे; परंतु काकू स्थिर राहून सुनेला नामजपादी आध्यात्मिक उपाय करायला सांगायच्या.
५ आ. नातीचा कान दुखत असल्याचे समजल्यावर तिला नामजप करायला सांगून सेवा पूर्ण झाल्यावर घरी जाणे आणि तोपर्यंत नातीच्या कानातील वेदना नाहीशा होणे : जालना येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी आल्यावर काकूंना त्यांच्या सुनेने भ्रमणभाष करून नातीचा कान पुष्कळ दुखत असल्याचे सांगितले. त्या वेळी काकू नातीशी भ्रमणभाषवर बोलल्या आणि तिला नामजप करायला सांगितला. त्यांनी नातीला नामजप ऐकवला. त्यांनी नातीला सांगितले, ‘‘सेवा झाल्यावर मी घरी येते. तोपर्यंत तू शांत रहा.’’ त्यानंतर नातीच्या कानातील वेदना नाहीशा झाल्या.
६. जाणवलेले पालट
६ अ. स्वभावदोष निर्मूलन सत्संगात स्वतःची चूक सांगणे : काकूंच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यांचे प्रयत्न करण्यात सातत्यही आहे. काकू इतरांना स्वतःच्या चुका विचारून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी त्यांना स्वभावदोष निर्मूलन सत्संगात चूक सांगण्याची भीती वाटत असे. आता त्या सत्संगात स्वतःची चूक सांगतात.
१ इ. सेवा मनापासून स्वीकारणे : ‘पूर्वी काकूंना सेवा सांगितल्यावर त्या अडचणी सांगायच्या; परंतु आता त्यांना कोणतीही सेवा सांगितल्यास त्या ‘ती सेवा कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो’, असा विचार करतात. काकूंनी ‘प्रत्येक सेवा मनापासून स्वीकारून ती पूर्ण करायची’, असे ठरवले आहे. त्याप्रमाणे काकू आता प्रयत्नही करतात.’
– सौ. अक्षरा बाबते आणि कु. चैताली डुबे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संभाजीनगर (७.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |