स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्य रथा’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लावलेल्या छायाचित्राला एस्.डी.पी.आय. पक्षाचा विरोध !

टिपू सुलतान याचे चित्र लावण्याची मागणी !

राष्ट्रप्रेमी हिंदूंनी अशा राष्ट्रघातकी पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे !

मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या पुत्तुरु तालुक्यातील कबल ग्रामपंचायतीने १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य रथ’ म्हणून वाहन सिद्ध केले होते. या रथावर लावलेल्या कापडी फलकावर म. गांधी, नेताजी बोस, टिळक यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र होते. सावरकर यांचे छायाचित्र असल्यामुळे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय) या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रथ रोखून धरला आणि कापडी फलक फाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी ग्रामपंचायत अध्यक्ष विनयकुमार कल्लेग आणि इतर सदस्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाली. ग्रामपंचायतीच्या अधिकार्‍यांनी आंदोलन करणार्‍यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे ऐकून न घेता कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र फाडून तिथे टिपू सुलतानचे चित्र लावण्याची मागणी केली. तसेच या वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ग्रामपंचायत यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. पुत्तुरु पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवले. त्यानंतर स्वातंत्र्य रथाची पोलिसांच्या रक्षणाखाली गावातच मिरवणूक काढण्यात आली. स्वातंत्र्य रथाला अडवून विरोध करणार्‍या एस्.डी.पी.आय.च्या ३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. के. अजीज, शमीर आणि अब्दुल रेहमान अशी त्यांची नावे आहेत.

या घटनेनंतर पुत्तुरुचे भाजपचे आमदार संजीव मठंदूरू यांनी पंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायत अध्यक्ष, तसेच उपस्थित असणार्‍यांकडून झालेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. या वेळी प्रसारमाध्यमांना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य रथाला विरोध करणार्‍या काही युवकांनी कासरगोडू आणि भटकळ येथील काही धर्मांध संघटनांच्या चिथावणीमुळे हे राष्ट्रविरोधी कृत्य केले आहे.