५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. श्रीहरि विवेक चौधरी (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीहरि विवेक चौधरी एक आहे !
श्रावण शुक्ल पक्ष दशमी (१७.८.२०२१) या दिवशी चि. श्रीहरि विवेक चौधरी याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि कुटुंबियांना त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
चि. श्रीहरि विवेक चौधरी याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. ‘मला गर्भधारणा झाल्यावर केलेल्या पहिल्या ‘सोनोग्राफी’त गर्भाचा आकार शंखासारखा दिसत होता. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ‘सोनोग्राफी’चे छायाचित्र दाखवल्यानंतर ते म्हणाले, ‘‘तो आकार शंखासारखाच आहे.’’
१ आ. मी सद्गुरु गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारल्यावर ते मला म्हणायचे, ‘‘तुमचा त्रास दूर होण्यासाठी तुम्ही नामजप करा. तुमच्या बाळाला काही त्रास नाही.’’
१ इ. आधुनिक वैद्यांनी काही चाचण्या करायला सांगितल्यावर सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य येतील’, असे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच होणे : तिसर्या मासात आधुनिक वैद्यांनी मला काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या. मी या संदर्भात सद्गुरु गाडगीळकाकांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य येणार आहेत.’’ त्याप्रमाणे माझ्या सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आले. यातून मला श्री गुरु आणि सद्गुरु यांची कृपा अनुभवता आली.
१ ई. सहाव्या मासापर्यंत मला माझ्या तोंडात गोडवा जाणवत होता. मी तिखट पदार्थ खाल्ला, तरी मला माझ्या तोंडात गोडवा जाणवायचा.
१ उ. नवव्या मासात माझी ‘सोनोग्राफी’ केल्यावर तिच्यामध्ये देवतांची विविध प्रकारची शस्त्रे दिसली. त्यांत परशुरामाचा परशु, धनुष्य-बाण, त्रिशूळ आणि एक वेगळेच दिव्य अस्त्र दिसले.’
– सौ. गौरी चौधरी (आई), फोंडा, गोवा.
१ ऊ. ‘विवेक आणि सौ. गौरी यांनी (श्रीहरीचे वडील आणि आई यांनी) बाळाच्या जन्मापूर्वी ‘पुंसवन’ (हा विधी पुत्रप्राप्तीसाठी करतात.) आणि ‘सीमंतोन्नयन’ (हा विधी ‘बाळाची वाढ चांगली व्हावी’, यासाठी करतात.) हे संस्कार विधी केले होते. त्या विधींच्या वेळी घरात पुष्कळ सात्त्विक वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा ‘दैवी बाळ जन्माला येणार आहे’, असे मला जाणवत होते.’
– सौ. सौख्या चौधरी (आत्या), वर्धा
२. जन्म
‘माझ्या नात्यातील एक स्त्रीरोग तज्ञ मला म्हणाल्या, ‘‘तुला लग्नानंतर ७ वर्षांनी गर्भधारणा होऊनही बाळाचा जन्म नैसर्गिक पद्धतीने होणे’, हे आश्चर्यजनक आहे.’’ तेव्हा ‘गुरुदेवांच्या कृपेमुळेच हे बाळ जन्माला आले’, याची मला जाणीव झाली.’
– सौ. गौरी चौधरी
३. जन्म ते ३ मास
३ अ. श्रीहरि झोपलेला असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्याला स्पर्श केल्यावर तो झोपेतही हसणे : ‘श्रीहरि ३ मासांचा असतांना आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा श्रीहरि झोपला असल्याने मी त्याला घेऊन स्वागतकक्षात बसलो होतो. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाका माझ्या जवळ आले आणि श्रीहरीच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाले, ‘‘बाळ किती शांत आणि आनंदी दिसत आहे !’’ तेव्हा सद्गुरु काकांच्या स्पर्शाने श्रीहरि झोपेतच हसला. त्या वेळी सद्गुरु काका म्हणाले, ‘‘अच्छा, बाळाला स्तुती केलेली कळली वाटते !’’ तेव्हाही श्रीहरि हसत होता.’
– श्री. विवेक चौधरी (वडील), फोंडा, गोवा.
३ आ. ‘त्याला जवळ घेतल्यावर मला माझ्या चुकांची जाणीव होते.
३ इ. आलेल्या अनुभूती
३ इ १. मुलीच्या बाळंतपणात घरातील कामे करतांना शारीरिक थकवा न जाणवणे किंवा कुठल्याही दुखण्याची जाणीव न होणे : मी बाळाच्या जन्मापासून ४ मास मुलीकडे (सौ. गौरीकडे) राहिले होते. तेव्हा मी व्यष्टी साधना करून घरातील कामे करत होते. एरव्ही मला एवढी कामे करण्याची सवय नाही; पण या वेळी मला शारीरिक थकवा जाणवला नाही किंवा कुठल्याही दुखण्याची जाणीव झाली नाही. याचे मला आश्चर्य वाटत होते. त्या वेळी देवानेच मला शक्ती दिली.’
– सौ. जयश्री माणिकपुरे (आजी (आईची आई)), राजगुरुनगर, जिल्हा पुणे.
३ इ २. बाळाला चलत्चित्राद्वारे प्रथमच पहातांना ‘त्याच्या भोवती पिवळे गोलाकार वलय असून सभोवती निळ्या रंगाचे जल आहे’, असे दिसणे : ‘बाळाचा जन्म झाला, त्या वेळी मी देहली सेवाकेंद्रात सेवा करत होते. मी बाळाला चलत्चित्राद्वारे (व्हिडिओद्वारे) प्रथम पाहिले. तेव्हा मला बाळाचा तोंडवळा तेजस्वी आणि शांत दिसला. ‘बाळाच्या भोवती पिवळे गोलाकार वलय असून सभोवती निळ्या रंगाचे जल पसरले आहे’, असे मला दिसले.’
– सौ. सुनंदा चौधरी (आजी (वडिलांची आई) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), वर्धा
३ इ ३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी बाळाचे ‘श्रीहरि’ असे नामकरण करणे आणि त्यामुळे ‘बाळाचे नाव श्रीकृष्णाचे असावे अन् सद्गुरूंनी त्याचे नामकरण करावे’, या दोन्ही इच्छा पूर्ण होणे : ‘बाळाचा जन्म श्रावण मासातील असल्याने ‘बाळाचे नाव श्रीकृष्णाच्या नावांपैकी असावे’ आणि ‘सद्गुरूंनी त्याचे नामकरण करावे’, अशी माझी इच्छा होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी बाळाचे नामकरण ‘श्रीहरि’ असे केले. देवाने माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या.’
– श्री. विवेक चौधरी
३ इ ४. नामजप करतांना श्रीहरीच्या भोवती चैतन्याचे प्रकाशमान वलय दिसणे : ‘३१.१०.२०२० या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करत होते. तेव्हा मला ‘श्रीहरीच्या भोवती चैतन्याचे सुंदर वलय असून ते पुष्कळ प्रकाशमान होत आहे’, असे दिसले. हे दृश्य मला ५ मिनिटे दिसत होते.
३ इ ५. मला श्रीहरीकडे बघून फार आनंद होतो आणि माझ्या मनातील अनावश्यक विचार नष्ट होतात.
३ इ ६. श्रीहरीला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि नंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जवळ घेतल्यावर ‘त्याला अनुक्रमे श्री सरस्वतीदेवी अन् श्री लक्ष्मीदेवी यांनी जवळ घेतले आहे’, असे वाटून भाव जागृत होणे : ‘आम्ही सर्व जण दसर्याच्या दिवशी रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीहरीला जवळ घेतले. तेव्हा ‘बाळ श्री सरस्वतीदेवीच्या जवळ आहे’, असे मला जाणवले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीहरीला जवळ घेतल्यावर ‘साक्षात् श्री लक्ष्मीदेवीनेच बाळाला घेतले आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.’
– सौ. जयश्री माणिकपुरे
४. वय ४ आणि ५ मास
अ. ‘श्रीहरि शांत आणि हसतमुख आहे. त्याचे डोळे बोलके आहेत. त्याच्याकडे पाहून फार प्रसन्न वाटते.
आ. ‘श्रीहरीशी सतत बोलत रहावे’, असे वाटते. त्याच्याशी बोलल्यावर तो लगेच हसून प्रतिसाद देतो.
इ. दिवाळीच्या वेळी श्रीहरीचे आई-वडील त्याच्यासह गोव्याहून चारचाकीने पुण्याला (हा १२ घंट्यांचा प्रवास आहे.) आले आणि त्यानंतर पुण्याहून वर्ध्याला (हा १६ घंट्यांचा प्रवास आहे.) आले. तेव्हा इतक्या दूरचा प्रवास करूनही श्रीहरि थकल्यासारखा वाटत नव्हता. आम्हा सर्वांना पाहून त्याला पुष्कळ आनंद झाला होता.
ई. श्रीहरीला पाहिल्यावर माझा आपोआप नामजप चालू व्हायचा.
उ. श्रीहरि रडत असतांना मी नामजप केल्यावर तो शांत होत असे.’
– सौ. सुनंदा चौधरी
ऊ. ‘दिवाळीत श्रीहरि वर्धा येथे आला होता. त्याचे खेळणे पाहून मला फार उत्साही वाटायचे आणि वातावरणात सकारात्मकता निर्माण व्हायची. श्रीहरीच्या हसण्याकडे आणि खेळण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जायचे.’
– श्री. अनुप चौधरी (श्रीहरीचे काका (वडिलांचे मोठे बंधू)), वर्धा
५. वय ६ ते ८ मास
५ अ. श्रीहरीचा अन्नप्राशन विधी रामनाथी आश्रमात पू. (श्रीमती) जलतारेआजींच्या हस्ते होणे आणि त्याला अन्नाची चव ठाऊक नसूनही त्याने पू. आजींकडे पुनःपुन्हा खाऊ मागणे : ‘श्रीहरि ६ मासांचा असतांना रामनाथी आश्रमात त्याचा अन्नप्राशन विधी (बाळाला प्रथम अन्न भरवण्याचा विधी) झाला. तेव्हा माझी भावजागृती होत होती. श्रीहरि तो संपूर्ण विधी शांतपणे बघत होता. नंतर पू. जलतारेआजींनी (सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांनी) श्रीहरीला खाऊ भरवला. तेव्हा श्रीहरीला अन्नाची चव ठाऊक नसतांनाही तो पू. आजींकडे पुनःपुन्हा खाऊ मागत होता आणि पू. आजींकडे बघून हसत होता.
५ आ. ‘जीविका परीक्षे’च्या वेळी श्रीहरीने मारुतीचे चित्र असलेल्या ‘सनातन वही’ला स्पर्श करणे : अन्नप्राशन विधीनंतर ‘जीविका परीक्षे’च्या वेळी श्रीहरीच्या भोवती ‘जपमाळ, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ, वस्त्र आणि मारुतीचे चित्र असलेली ‘सनातन वही’, या वस्तू ठेवल्या होत्या. त्या वेळी त्याने मारुतीचे चित्र असलेल्या ‘सनातन वही’ला स्पर्श केला. (‘जीविका परीक्षा’ या विधीच्या वेळी बाळाच्या भोवती काही वस्तू ठेवतात. त्या वस्तूंपैकी बाळ ज्या वस्तूकडे वळेल किंवा ज्या वस्तूला हात लावेल, त्या वस्तूवरून ‘बाळाच्या आयुष्याचा कल कुठे असेल ?’, हे कळते.’ – संकलक)
५ इ. श्रीहरि कधी रडत असतांना भ्रमणभाषवर गीतरामायणातील गाणी लावल्यावर तो लगेच आनंदाने टाळ्या वाजवायला लागतो.’
– सौ. गौरी चौधरी
६. वय ९ ते १२ मास
अ. ‘श्रीहरि सतत पुष्कळ आनंदी असतो. त्याला नामजप, भजने आणि भावजागृतीचे प्रयोग ऐकायला फार आवडते.’
– सौ. सौख्या चौधरी
आ. ‘महर्षींच्या आज्ञेने झालेला प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्तचा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ पहात असतांना श्रीहरि प.पू. गुरुदेवांकडे पाहून टाळ्या वाजवत होता. त्या दिवशी सकाळपासूनच तो उत्साही वाटत होता.
इ. पूर्वी श्रीहरीला ‘प.पू. आबा, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे बोट दाखवायचा. त्याला ‘श्रीकृष्ण कुठे आहे ?’, असे विचारल्यावर तो श्रीकृष्णाच्या चित्राकडे बोट दाखवायचा; मात्र आता त्याला ‘प.पू. आबा कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर तो श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघतो.’
– सौ. गौरी चौधरी
७. अनुभूती
नाडीभविष्यात सांगितल्याप्रमाणे श्रीहरीच्या जन्मानंतर आर्थिक परिस्थिती सुधारणे : ‘वर्ष २०१५ मध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचे नाडीभविष्य पाहिले होते. त्या वेळी माझ्या नाडीपट्टीत सांगितले होते, ‘तुम्हाला मूल झाल्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.’ त्याप्रमाणे श्रीहरीच्या जन्मानंतर श्री गुरूंच्या कृपेने आमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे.’
– श्री. विवेक चौधरी
८. श्रीहरीचा स्वभावदोष : हट्टीपणा
९. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे श्रीकृष्णा, हे प.पू. गुरुमाऊली, श्रीहरीसारखे गोड आणि हसरे बाळ आम्हाला दिल्याविषयी आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
‘आम्ही हे बाळ सांभाळण्यासाठी असमर्थ आहोत. तुम्हीच आमच्याकडून त्याचा योग्य रितीने सांभाळ करवून घ्या’, अशी आपल्या पावन चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. गौरी चौधरी (१८.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |