भारतीय नौदलाने वास्को येथील सेंट जेसिंतो बेटावर स्थानिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्याच्या प्रकरणी राज्यभरातील देशप्रेमी नागरिकांचे अभिप्राय !

योग्य पद्धतीने तोडगा काढल्याविषयी गोवा शासन आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सांखळी येथील देशप्रेमींकडून अभिनंदन

सांखळी, १५ ऑगस्ट (वार्ता.) – भारतीय नौदलाने वास्को येथील सेंट जेसिंतो बेटावर १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी स्थानिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. प्रारंभी स्थानिकांनी हे बेट खासगी मालमत्ता असल्याचा दावा करून त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यास विरोध केला होता. स्थानिकांच्या विरोधानंतर नौदलाने ध्वजारोहण कार्यक्रम रहित केला होता; मात्र या प्रकरणाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर नोंद घेऊन नौदलाला ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सांगून त्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर बेटावर स्थानिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या पार्श्वभूमीवर सांखळी येथील देशप्रेमी नागरिकांनी १४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सांखळी येथील पुतळ्याजवळ एकत्र येऊन सेंट जेसिंतो बेटावरील स्थानिकांच्या विरोधावर योग्य पद्धतीने तोडगा काढल्याविषयी गोवा शासन आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले. ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याविषयीही सांखळी येथील देशप्रेमी नागरिकांनी बेटावरील स्थानिक नागरिकांचे अभिनंदन केले. प्रत्येक नागरिकाने भारत आपला देश मानला पाहिजे आणि असे न केल्यास देशाच्या अखंडतेला हानी पोचेल, असे नागरिकांनी पुढे म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जुझे फिलिप यांची ध्वजारोहणाला विरोध करणारी वागणूक देशद्रोही ! – भाजप

म्हापसा – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची ध्वजारोहणाला विरोध करणारी वागणूक देशद्रोही आहे. जुझे फिलिप यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी सर्वांची क्षमा मागावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी जुझे फिलिप यांना पक्षातून काढून टाकावे अन्यथा आम्ही त्यांना कुठल्याच व्यासपिठावर बसण्यास देणार नाही. त्यांना काळे फासण्यास येईल, अशी चेतावणी भाजपचे संदीप फळारी यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.