भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सर्वांच्या सहकार्याने साजरे करूया ! – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा करतांना राज्यात पहिल्या ५ क्रमांकांत जिल्ह्याचे नाव राहील, अशा पद्धतीने काम करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील पोलीस कवायत मैदानात भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तसेच महसूल आणि इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
रानभाज्यांचे वाढते महत्त्व लक्षात घेता शेतकर्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे ! – पालकमंत्री उदय सामंत
कुडाळ – रानभाज्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. माणूस मांसाहाराकडून शाकाहारी होत आहे. त्यामुळे रानभाजी पिकवणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात बंद ठेवण्यात आलेले आठवडा बाजार कोरोनाचे सर्व नियम पाळून येत्या ८ दिवसांत चालू करा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे चालू असलेल्या जिल्हास्तरीय ‘रानभाजी आणि वनऔषधी वनस्पती महोत्सवा’च्या समारोप कार्यक्रमात केली. १४ आणि १५ ऑगस्ट, असे दोन दिवस हा महोत्सव कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर करण्यात आले ध्वजारोहण
मालवण – देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय तटरक्षक दलाच्या वतीने येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील टेहळणी बुरुजावर तटरक्षक दलाच्या गोवा आणि रत्नागिरी येथील सैनिकांच्या उपस्थितीत अन् मंडळ अधिकारी रवींद्र निपाणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रतिवर्षी महसूल विभाग आणि किल्ल्यावरील रहिवासी यांच्या वतीने शासकीय ध्वजारोहण करण्यात येते. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी भारतीय तटरक्षक दल आणि सागरी सुरक्षा दल यांच्या सहभागातून हा सोहळा करण्यात आला.