सातारा शहर परिसरामध्ये विषबाधा होऊन ८ कुत्र्यांचा मृत्यू !
सातारा, १५ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजवाडा परिसरात अज्ञातांकडून भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये ८ कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. शहरातील प्राणीप्रेमींनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे; मात्र या मागणीकडे महापालिकेकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. १० ऑगस्टच्या रात्री काटदरे कॉर्नरच्या वाहनतळाजवळ २ कुत्री मृतावस्थेत आढळून आली. पुढील एका घंट्यात पालिका वाहतूक कार्यालयाच्या दारात १ कुत्रा मृतावस्थेत आढळला. त्यामुळे अज्ञातांकडून कुत्र्यांवर विषप्रयोग झाल्याचा संशय आला. शहरात काम करणार्या ‘व्ही केअर’ या प्राणीप्रेमी संघटनेच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु तोपर्यंत ८ कुत्र्यांनी प्राण गमावले होते.
(प्रशासनाने वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याचा परिणाम ! यातून बोध घेऊन भटक्या कुत्र्यांची समस्या त्वरित सोडवावी, ही अपेक्षा ! – संपादक)