राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पुणे येथील शिवसृष्टीला भेट !
पुणे, १५ ऑगस्ट – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी १५ ऑगस्ट या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृृष्टीला भेट देऊन शिवसृृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पहाणी केली, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चाही केली.
आंबेगाव येथे शिवसृृष्टीची पहाणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, आचार्य गोविंदगिरी महाराज आदी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी शिवसृृष्टी उभी करत आहेत ती सार्वकालिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून देशभरातून लोक शिवसृृष्टी पहायला येतील. त्यातून प्रेरणा मिळेल, शिवाजी महाराज यांनी पराक्रम, शौर्य, चातुर्य यांच्या जोरावर नवीन कीर्ती स्थापन केली. महाराष्ट्रात असणारे किल्ले प्रेरणास्रोत आहेत.