५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. अनंत अमित देखणे (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अनंत अमित देखणे हा एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘आम्ही साडेसात वर्षे आशिया पॅसिफिक येथे रहात होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच आमच्याकडून साधना करवून घेतली. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांच्याच कृपेने माझे (सौ. आदिती देखणे यांचे) यजमान श्री. अमित यांना बोईसर (मुंबई) येथे नोकरी लागली आणि आम्ही भारतात परत आलो. येथेही देव आमच्याकडून सेवा आणि साधना करवून घेत आहे. मला चि. अनंतच्या जन्मापूर्वी अन् गरोदरपणात जाणवलेली सूत्रे, तसेच चि. अनंतच्या जन्मानंतर मला आणि यजमानांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
१ अ. बाळाच्या जन्मापूर्वी मिळालेले शुभसंकेत आणि गर्भधारणा !
१ अ १. भारतात आल्यावर महडच्या गणपतीच्या दर्शनाला जाणे, तेव्हा तेथील ताटातील कुंकवात ‘ॐ’ उमटणे : आम्ही एक मासाच्या वार्षिक सुट्टीसाठी भारतात आलो होतो. २१.६.२०१९ या दिवशी आम्ही महड (जिल्हा रायगड) येथील श्री गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. तेथे ताटातील कुंकवात ‘ॐ’ उमटला. तेव्हा ‘हा दैवी संकेत कशासाठी आहे ?’, हे आम्हाला कळले नव्हते. २२.६.२०१९ या दिवशी अनपेक्षितपणे मला दिवस गेल्याचे लक्षात आले. त्याआधी एक मासापासून माझा आपोआप श्रीरामाचा नामजप अखंड व्हायचा; पण मला त्याचे कारण ठाऊक नव्हते.
१ अ २. ‘साधिकेला पू. भार्गवराम प्रभु यांच्यासारखे बाळ झाले आहे’, असे वहिनीला स्वप्न पडणे : त्यानंतर आम्ही आशिया पॅसिफिक येथे परत आलो. तेव्हा माझ्या वहिनीला ‘माझ्या पोटी सनातनचे बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्यासारखे बाळ जन्माला आले आहे’, असे स्वप्न पडले. प्रत्यक्षात मला दिवस गेल्याचे माझ्या वहिनीला ठाऊक नव्हते.
१ आ. उन्नत जीव जन्माला येण्यासाठी प्रार्थना करणे : आम्ही भारतातून आशिया पॅसिफिकला परतल्यावर माझे नामजपादी उपायांचे प्रयत्न होऊ लागले. मला ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चा साप्ताहिक सत्संग आणि मराठी भावसत्संग यांचा लाभ झाला. आरंभी ४ मासांपर्यंत मी आणि माझे यजमान ‘आमच्या पोटी उच्च लोकातील उन्नत जीव जन्माला येऊदे. आमची साधना सतत होऊदे’, अशी प्रार्थना करत होतो.
१ इ. यजमान रामनाथी आश्रमात शिबिरासाठी आल्यावर लहान मुलासह दुबईत एकटी रहात असतांना ‘श्रीकृष्ण समवेत आहे’, असे जाणवणे आणि घरात दैवी कण दिसणे : मला तिसरा मास चालू असतांना माझे यजमान एका शिबिरासाठी भारतात गोवा येथील रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा मी माझा साडेतीन वर्षांचा मोठा मुलगा अथर्व याच्यासह ९ दिवस एकटी राहिले होते. तेव्हा ‘श्रीकृष्ण सतत माझ्या समवेत आहे’, असे मला जाणवत होते आणि घरात दैवी कणही सतत दिसत होते.
१ ई. गरोदरपणी झालेले त्रास आणि केलेले प्रयत्न
१ ई १. बाळाविषयी पुष्कळ नकारात्मक विचार येणे आणि त्याच वेळी ‘आतून अखंड नामजप चालू आहे’, असे जाणवणे : मला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. तिसर्या आणि चौथ्या मासात माझ्या मनात बाळाविषयी पुष्कळ नकारात्मक विचार यायचे. त्यावर स्वयंसूचना घेतल्यावर माझे मन सकारात्मक झाले. अनेकदा माझ्या आध्यात्मिक त्रासात अकस्मात् वाढ व्हायची; पण त्याच वेळी ‘आतून आपोआप अखंड नामजप होत आहे. माझे शरीर युद्धभूमी असून मोठा संघर्ष होत आहे’, असेही मला जाणवायचे.
मी गर्भरक्षणासाठी प्रतिदिन १ घंटा ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’, असा नामजप करायचे आणि ‘माझ्या गर्भातील बाळाचे रक्षण होऊन त्याच्या भोवती तुझ्या कृपेचे संरक्षककवच निर्माण होऊदे’, अशी प्रार्थनाही करायचे. मी घरात भ्रमणभाषवर लहान आवाजात सतत भजने आणि नामजप लावून ठेवायचे.
१ उ. गर्भारपणी जाणवलेले चांगले पालट
१ उ १. सात्त्विकतेची ओढ लागणे
अ. बाहेरचे अन्न खाण्याची इच्छा पूर्णपणे नष्ट होऊन मला ‘सात्त्विक अन्नच खावे’, असे वाटायचे.
आ. माझ्याकडून कार्तिक मासात प्रतिदिन अभ्यंग स्नान केले गेले.
१ उ २. देवाविषयी ओढ वाढणे
अ. देवाने माझ्याकडून नवरात्रीतील दुर्गाष्टमीपासून प्रतिदिन श्री बगलामुखी स्तोत्र ऐकवून घेतले. ते स्तोत्र भावपूर्ण ऐकतांना मला गर्भातील बाळाची हालचाल जाणवायची.
आ. देव माझ्याकडून प्रतिदिन सूर्याला नमस्कार करवून घ्यायचा.
इ. ‘पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घ्यावे’, अशी मला ओढ लागायची.
१ उ ३. आश्रमाची आणि संतांच्या दर्शनाची ओढ लागणे
अ. अनेकदा मला आश्रमात जाण्याची तीव्र इच्छा व्हायची. ‘रामनाथी किंवा देवद आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करावी. आश्रमातील सात्त्विक वातावरण अनुभवावे आणि संतांचे दर्शन व्हावे’, अशी मला ओढ लागायची.
आ. अनेक वेळा माझा श्री गुरूंप्रतीचा भाव जागृत व्हायचा. मला परम पूज्यांची पुष्कळ आठवण यायची. त्यांचे छायाचित्र पहातांना मी निर्विचार आणि आनंदी अवस्था अनुभवायचे.
१ ऊ. गरोदरपणात वजन वाढले असूनही कोणतीही शारीरिक व्याधी न होणे आणि शेवटपर्यंत घरातील सर्व कामे करता येणे ः माझे वजन सातव्या मासाच्या आरंभी पुष्कळ वाढले. तेव्हा ‘मधुमेह होईल का ?’, अशी मला चिंता लागली होती; पण गुरुकृपेने माझे आरोग्य एकदम चांगले होते. गुरुकृपेनेच मला रक्तदाब किंवा मधुमेह यांसारखे त्रास झाले नाहीत. आठव्या आणि नवव्या मासात माझे वजन पुष्कळ असूनही मी घरातील सर्व कामे करू शकले.’
– सौ. आदिती अमित देखणे (आई)
२. जन्मानंतर
‘बाळाचा जन्म झाल्यावर बाळ एकदम तेजस्वी दिसत होते. त्याची दृष्टी स्थिर होती. ते आवाजाच्या दिशेने लगेच पहायचे.
२ अ. जन्म ते ६ मास
१. चि. अनंत (बाळ) अतिशय सहनशील आहे. त्याला लस दिल्यानंतर तो अगदी थोडेसे रडला. नंतर त्याने अजिबात त्रास दिला नाही. कधी त्याला काही लागले, तरी तो सहन करतो. रडून त्रास देत नाही.
२. तो रडत असतांना भ्रमणभाषवर नामजप किंवा स्तोत्रे लावल्यास तो एकाग्रतेने ऐकतो आणि ते ऐकत असतांनाच झोपतो.
३. तो सतत हसत असतो. त्यामुळे त्याचा सहवास घरच्या सर्वांनाच अतिशय हवाहवासा वाटतो.
२ आ. ६ मास ते १ वर्ष
१. तो अगदी सहजपणे सर्वांमध्ये मिसळतो.
२. तो धीटही आहे. तो कुठल्याही प्राण्यांना घाबरत नाही आणि त्यांना हात लावायला त्यांच्या जवळ जातो.
३. तो त्याच्या मोठ्या भावाशी शांतपणे खेळतो. अनेकदा मी भ्रमणभाषवर सेवा करत असतांना तो शांतपणे भावाशी खेळतो.
२ इ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये
१. अनेक वेळा झोपेत त्याच्या हाताची मुद्रा नामजप करत असल्याप्रमाणे दिसते. झोपेत ‘तो ध्यानात आहे’, असेही बर्याचदा जाणवते.
२. कधी कधी जागेपणी तो घोषणा देत असल्याप्रमाणे त्याचा हात वर उचलतो.
३. त्याला परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि देवता यांची चित्रे दिसल्यास तो ती हातात घेण्यासाठी धडपडतो. भ्रमणभाषवर सद्गुरु सिरियाक वाले यांचा किंवा सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा नामजप सत्संग लावल्यास तो भ्रमणभाष हातात घेऊन त्यावरील संतांच्या तोंडवळ्याला हात लावतोे.
४. मी श्रीकृष्णाला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर तो माझ्याकडे पाहून गोड हसतो. त्या वेळी ‘श्रीकृष्णच माझ्याकडे पहात असून प्रार्थनेला प्रतिसाद देत आहे’, असे मला वाटते.
२ ई. साधिकेला होत असलेला आध्यात्मिक लाभ : कधी कधी माझी मनःस्थिती चांगली नसते. तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसतो. त्यानंतर माझी मनःस्थिती चांगली होते. त्याच्या जन्मानंतर मला होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात उणावला आहे.
३. स्वभावदोष
कधी काही मनाविरुद्ध झाल्यास तो हट्टीपणा करतो.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘श्री गुरूंच्या कृपेने चि. अथर्व आणि चि. अनंत यांच्यासारखी मुले आम्हाला दिल्यामुळे श्री गुरूंच्या चरणी कोटीशः
कृतज्ञता !’ ‘हे गुरुमाऊली, आम्ही आपल्या चरणी शरण आलो आहोत. या बाळांचा सांभाळ करणारे आपणच आहात. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. आम्हा सर्वांकडूनच आपण अखंड साधना करवून घ्यावी आणि आमच्याकडून या दोन्ही मुलांवर उत्तम अन् साधनेचे संस्कार करवून घ्यावेत’, अशी प्रार्थना !’
– सौ. आदिती अमित देखणे आणि श्री. अमित देखणे (आई-वडील) (१६.४.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |