‘वाईट शक्ती चांगल्या कार्यात कसे विघ्न आणतात’, हे देवाने साधिकेला दृश्यरूपात दाखवणे
१. सूक्ष्मातून गुरुदेवांना आढावा देतांना दिसलेल्या दृश्यात आश्रमातील यज्ञकुंडाजवळ उभे असलेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांच्या दिशेने एका व्यक्तीने रागाने दगड मारणे, सद्गुरु गाडगीळकाकांनी जागेवरूनच अंग वळवल्याने त्यांना दगड न लागणे
‘२.५.२०२० च्या रात्री मी माझी सेवा आटोपून माझ्या निवासखोलीत आले. मी वैयक्तिक आवरून अंथरूणावर पहुडले. त्यानंतर मी देवाला (परात्पर गुरुदेवांना) दिवसभराचा आढावा देऊ लागले. मी गुरुदेवांना दुपारी १ वाजेपर्यंतचा आढावा दिला आणि अचानक मला समोर दृश्य दिसले. ‘आश्रमातील यज्ञकुंडाजवळ एक व्यक्ती हातांत एक मोठा दगड घेऊन आली आहे. ती तो दगड सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांच्या दिशेने फेकत होती. सद्गुरु काका औदुंबराच्या झाडाच्या बाजूला उभे राहून यज्ञकुंडाकडे बघत होते. ‘त्या व्यक्तीने प्रत्येक वेळी दगड फेकल्यावर सद्गुरु काका जागेवरूनच अंग वळवत होते; म्हणजे डाव्या बाजूकडून दगड आला, तर ते उजव्या बाजूला वळत होते आणि उजव्या बाजूने दगड आला, तर डाव्या बाजूला अंग वळवत होते. त्यामुळे त्यांना ते दगड लागत नव्हते. ती व्यक्ती ५ – ६ वेळा मोठमोठे दगड घेऊन रागारागाने मारत होती. तरीही सद्गुरु काका दृष्टी न वळवता यज्ञाकडेच बघत होते.
२. सद्गुरु काका सूक्ष्म-परीक्षण करून साधकांना उपाय सांगत असल्यानेच त्या व्यक्तीने त्यांना दगड मारून त्रास देण्याचा प्रयत्न करणे
त्या वेळी पुन्हा मला ते दृश्य दिसले. तेव्हा मनात विचार आला, ‘ती व्यक्ती किती रागीट होती ! सद्गुरु गाडगीळकाका सूक्ष्म-परीक्षण करून (त्रास असलेल्या साधकांना) नामजपादी उपाय सांगतात; म्हणूनच ती व्यक्ती त्यांना रागाने दगड मारून त्रास देण्याचा प्रयत्न करत होती; परंतु काका मात्र स्थिर होते. देवच त्यांना सांभाळत आहे.’
३. अचानक तेथे एका आसंदीवर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बसलेल्या दिसणे आणि त्यांना पाहून ती व्यक्ती अदृश्य होणे
त्या व्यक्तीने सद्गुरु काकांना मारण्यासाठी पुन्हा दगड हातात घेतला. अचानक तेथे आसंदीवर मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बसलेल्या दिसून ती व्यक्ती अदृश्य झाली.
४. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना पाहून त्या व्यक्तीची शक्ती संपल्याने ती घाबरून अदृश्य झाली असेल’, असा विचार मनात येणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू आल्यानंतर त्या व्यक्तीची शक्ती संपली असेल. त्यांच्या पुढे तिचे काही चालले नाही. ती व्यक्ती घाबरली असेल आणि अदृश्य झाली असेल’, असा विचार माझ्या मनात आला.
तेव्हा ‘वाईट शक्ती चांगल्या कार्यात कसे विघ्न आणतात ?’, हे देवाने मला दृश्यरूपात दाखवले. यासाठी मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०२०)
|