प्रसिद्धीमाध्यमे लोकशाहीचा चौथा खांब असून प्रसारमाध्यमे आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधावा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

जिल्हाधिकारी राहुल रेखावार (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना राजेश क्षीरसागर (उजवीकडे)

कोल्हापूर, १५ ऑगस्ट – कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रलंबित असून त्याचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली. प्रसिद्धीमाध्यमे लोकशाहीचा चौथा खांब असून प्रसारमाध्यमे आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधावा, असे आवाहन श्री. राजेश क्षीरसागर यांनी या वेळी केले.

कोल्हापूर महानगरपालिकेने नगरोत्थान मधून संमत होणार्‍या १७८ कोटी रुपयांच्या निधीचा आराखडा सिद्ध करावा. गतवेळच्या महापुराच्या धर्तीवर या वर्षीच्या महापुराच्या पाण्यात बाधित झालेल्या सदनिकेवरील वरच्या मजल्यावरील रहिवासी नागरिकांनाही शासनाने साहाय्य घोषित करावे, कोल्हापूर जिल्ह्यात ‘आयटी पार्क’सारखी संकल्पना राबवण्याचा आराखडा सिद्ध करावा,

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा शासनाकडून संमत झाला असून, त्याच्या निधीकरिता पाठपुरावा करावा, अशा सूचनाही श्री. क्षीरसागर यांनी या वेळी केल्या. या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. जयंवत हारुगले, माजी नगरसेवक श्री. रविकिरण इंगवले उपस्थित होते.